कोरोना लसीकरणबाबत मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी वेधले लक्ष
*⚡सावंतवाडी ता.२६-:* सद्य स्थितीत प्रशासनाकडून गावागावांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण होत आहे. परंतु काही ठिकाणी आपल्या मर्जीतील लोकांना व नातेवाईकांना लस दिली जात असून, अनेक जण लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी तातडीने सदर लसीकरणावेळी ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी आरोग्य विभागाचा अधिकारी किंवा कर्मचारी नियुक्त करावा व जोपर्यंत आरोग्य अधिकारी येत नाही. तोपर्यंत नाव नोंदणी करू नये. अशी मागणी मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच तालुक्यातील प्रत्येक गावात 100% लसीकरण होण्यासाठी राज्य सरकारने व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केंद्राकडे जास्तीत जास्त लसीची मागणी करावी ग्रामीण भागात भासणारा लसीचा तुटवडा भरून काढावा आणि येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत ग्रामीण भागात 100% लसीकरण करावे अशी मागणी गुरुदास गवंडे यांनी केली आहे.
