*बंधाऱ्यातून पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने पाणी आजूबाजूच्या बागायतीत घुसून नुकसान
*💫सावंतवाडी दि.२१-:* तालुक्यातील मळेवाड कोंडुरे मार्गावरील पूलानजिक कोंडूरे नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात पावसाच्या दिवतात बऱ्याच प्रमाणात पाण्याच्या प्रवाहामुळे गाळ, लाकड, कचरा अडकल्यामुळे नदीचे पाणी आजूबाजूच्या बागायतीत शिरत असल्याने येथील बागायती धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बागायतदार यांचे मोठे नुकसान होत आहे. बंधाऱ्यातून पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने पाणी आजूबाजूच्या बागायतीत घुसून नुकसान होत आहे. याचा फटका बागायतदार शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. मळेवाड कोंडुरे मार्गावरील पूलानजिक कोंडूरे नदीवर पक्का बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र सध्या या बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी पूर्णपणे धास्तावला आहे. दरवर्षी कोंडूरे येथील न्हानु (बापू) मुळीक व त्यांचे सहकारी हे सरकारी मदतीची वाट न बघता हा बंधारा साफ करण्याचे काम स्व खर्चाने करतात. मात्र यावेळी त्यांचा कामधंदा बंद असल्यामुळे ते काहीच करू शकत नाही. बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य असल्यामुळे तसेच हे काम मोठ खर्चिक असल्याने त्यांच्या पुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी संबधित खात्याने याची तात्काळ दखल घेऊन बागायतदार शेतकऱ्याचा प्रश्न सोडवून संभाव्य धोका टाळावा अशी मागणो येथील शेतकरी बागायतदार करत आहे.
