वीज मीटर खोलीतील बसबार नादुरुस्त ;बिल न मिळाल्याने ठेकेदाराने दुरुस्तीस दिला नकार
*💫कणकवली दि.१२-:* कणकवली बस स्थानकातील वीज मीटर जोडणी खोलीमधील बसबार नादुरुस्त झाला आहे. परिणामी स्थानकातील वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. कमी-जास्त दाबाने वीज पुरवठा होत असल्याने वीज उपकरणे नादुरुस्त व्हायला लागली आहेत. संबधित ठेकेदाराने आपली दीड वर्षापूर्वीची लाखो रुपयांची देयके न मिळाल्याने दुरुस्तीचे काम करण्यास अमर्थता दाखवली आहे. परिणामी एस. टी. स्थानकासह दुकानदारही अडचणीत आले आहेत. कणकवली स्थानकातील बिघाड झालेल्या बसबार किमान चाळीस वर्षांहुन जूना आहे. वीज मंडळाच्या कर्मचार्यांनी निरीक्षण केल्यावर या बसबारमध्ये कार्बन पकडला असून नटबोल्टही गजले आहेत. आगार व्यवस्थापक राजन यादव यांना त्याची माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने सर्वंसंबधितांशी संपर्क साधला. दुरुस्तीचा ठेका असलेल्या वीज ठेकेदाराशी संपर्क साधला. संबधितानी पहाणी केली. याठिकाणी एक १०० अँम्पिअर क्षमतेचा बसबार पुर्वीच बसवून ठेवण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या ११ मीटरांची जोडणी नव्याने या बसबारमध्ये करण्यासाठी वीज मंडळाकडून पोलवरील वीज पुरवठा खंडित करावा लागणार आहे. तसेच हे खर्चिक काम आहे. आमची दिड वर्षापूर्वीची देयके अद्याप मिळाली नाहीत. कामगारांचे पगार थकले आहेत. त्यामुळे संबधितानी दुरुस्ती करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. कमी-जास्त दाबाने वीज पुरवठा होत असल्याने स्थानकातील तीनही एल ई डी दूरदर्शन संच बंद पडले आहेत. ते दुरूस्त करण्याचा प्रयत्न आज अयशस्वी ठरला. सीसीटिव्ही यंत्रणा बंद पडण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. इतरही विद्युत उपकरणे बंद पडण्याची शक्यता आहे. दरम्यान स्थानकातील सर्वं दुकाने प्रवासी वाहतूकी अभावी गेले तीन महीने बंद आहेत. प्रवासी वाहतूक सुरु होत असल्याने दुकानदार थोडेसे सुखावले होते. मात्र वीज पुरवठ्याचे अरीष्ठ आल्याने ते धास्तावले आहेत. एस. टी. च्या अधिकार्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम करावे अशी मागणी ते करीत आहेत
