तौक्ते वादळानंतर वीज वितरणचे चांगले काम

नगराध्यक्ष कांदळगावकर यानी आभार

मालवण दि प्रतिनिधी तौक्ते वादळाच्या तडाख्यात मालवणात वीज पोल व वीज तारा कोसळून मोठे नुकसान झाल्यानंतर वीज वितरण विभागाने परिश्रम घेऊन वीज पुरवठा सुरळीत करून वादळ काळात चांगले काम केल्याबद्दल वीज वितरण विभागाचे मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आभार मानतानाच पावसाळा कालावधीत मालवणातील वीज व्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत उपाययोजना करावी अशी सूचनाही कांदळगावकर यांनी वीज अभियंत्यांना निवेदन सादर करत केली आहे. मालवण येथील वीज वितरण कार्यालयातील वीज अभियंत्यांशी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी भेट घेत पावसाळा कालावधीत वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या उपाययोजना करण्याबाबत निवेदन सादर केले. यावेळी नगरसेवक मंदार केणी, पंकज सादये, तपस्वी मयेकर, राजू परब आदी व इतर उपस्थित होते. पावसाळा सुरु झाला असून यासाठी वीज वितरण विभागाने आपली आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक आहे. कारण वादळामुळे बऱ्याच झाडांची मुळे ही कमकूवत झाली आहेत. आणि अशावेळी भर पावसात वाऱ्यामुळे ही झाडे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी अशा झाडांचा सर्व्हे झाला असल्यास त्यावर पुढील उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या आपत्कालीन परिस्थितीमुळे पोल आणि त्यांना लागणारे मुबलक साहित्याची मागणी करून ठेवावी. दरवर्षीपेक्षा यावर्षी पावसात वीज विभागाला मनुष्यबळ जादा लागण्याची शक्यता बघता जशी वादळाच्या वेळी जादा टिम मागणी करणे आवश्यक आहे, तशी याबाबत कोणती उपाययोजना केली याची माहिती अवगत करावी, अशी मागणी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केली आहे. तसेच मालवण शहरात सध्या बऱ्याच ठिकाणी स्ट्रीट लाईटचे कन्डेन्सर ओढण्याचे काम बरेचसे प्रलंबित आहे. वादळाच्या दरम्यान पोलची पडझड झाली आहे. त्यामुळे पडलेले सर्व पोल अद्याप पर्यंत त्याच ठिकाणी आहेत. पावसाळा सुरु झाला आहे. आणि त्यामुळे गटारात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. तरी याकामाचे पण नियोजन करावे. वादळामध्ये जनतेने वीज विभागाला बरेच सहकार्य केले आहे. तसेच वादळाच्यावेळी दहा- पंधरा दिवस लाईटच्या समस्याबाबतही सहकार्य केले आहे. परंतू या पावसाळ्यात अशाच प्रकारची घटना घडल्यास लोकांची मानसिकता तशी राहणार नाही आणि याचा रोष वीज विभागावर पर्यायाने लोकप्रतिनिधींवर येण्याच शक्यता आहे, असेही कांदळगावकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page