मालवण व्यापारी संघांचा निर्णय; सर्व व्यवहार रोखीने करण्याचे व्यापाऱ्यांना आवाहन..
⚡मालवण,ता.३०-:
पैशांच्या ऑनलाईन देवघेवीवर ०.४ टक्के एमडीआर लागू करण्याच्या प्रस्तावित निर्णयाविरोधात व्यापारी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. या प्रस्तावित निर्णयाबद्दलच्या व्यापाऱ्यांच्या तीव्र भावना केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने देशपातळीवरील सर्व व्यापारी संघटनांच्या साथीने येत्या २ ऑक्टोबर रोजी ‘नो युपीआय डे’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
या आवाहनाला प्रतिसाद देत, तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांनी २ ऑक्टोबर रोजी सर्व प्रकारचे व्यवहार फक्त रोखीनेच करावेत, असे आवाहन सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ आणि मालवण तालुका व्यापारी संघाच्या वतीने संयुक्तपणे करण्यात आले आहे.
२ ऑक्टोबर रोजी कोणत्याही ग्राहकाकडून ऑनलाईन युपीआयद्वारे पैसे स्वीकारले जाणार नाहीत. ग्राहकांना याबाबत नम्रपणे पण ठामपणे नकार देऊन रोख व्यवहाराची विनंती केली जाईल. आमचा युपीआय किंवा एमडीआरला विरोध नाही, परंतु या एमडीआरचा आर्थिक भुर्दंड व्यापाऱ्यांच्या माथी मारला जाऊ नये, एवढीच आमची प्रमुख मागणी आहे,” असे स्पष्टीकरण व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या व्यापारी बांधवांनी २ ऑक्टोबरच्या या आंदोलनात शंभर टक्के सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरूरकर, तालुका व्यापारी संघ अध्यक्ष प्रमोद ओरसकर यांनी केले आहे.

