Headlines

‘सर्वांच्या कल्याणाची भावना हाच सद्धर्माचा खरा मार्ग’…

परमात्मराज महाराज; आडी येथील श्री दत्त देवस्थान मठात भाद्रपद पौर्णिमेनिमित्त प्रवचन..

⚡बांदा ता.२७-: केवळ स्वार्थासाठी तसेच समाजात परस्पर तेढ निर्माण करणारी भाषणे ऐकणे टाळून सर्व मानवांच्या हिताचा विचार करणे, हाच सद्धर्माचा खरा मार्ग आहे. संपूर्ण मानवजातीचा एकच धर्म असून भौतिक स्वार्थापेक्षा सद्धर्माचे आचरण आणि सर्वांच्या कल्याणाची भावना बाळगणे, हाच जीवनाचा सार्थक मार्ग आहे, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले.

आडी येथील श्री दत्त देवस्थान मठातर्फे भाद्रपद पौर्णिमेनिमित्त आयोजित प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते. सकाळी श्री दत्त मंदिरातील दत्तगुरूंच्या चरणचिन्हांवर अभिषेक व महाआरती करण्यात आली. रात्री नामजपानंतर प्रवचन झाले.
परमात्मराज महाराज म्हणाले, ‘‘उपदेश म्हणजे केवळ शब्द नसून त्यामागील बोध समजून घेणे महत्त्वाचे आहे. कोणता उपदेश कोणत्या वेळी, कोणासाठी आणि कशासाठी केला आहे, हे समजून घेतले पाहिजे. संदर्भ न समजता उपदेशाचा अर्थ लावल्यास त्यातून गोंधळ निर्माण होऊ शकतो.’’ त्यांनी डॉक्टरांनी अर्धा तास चालण्याचा सल्ला दिल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ घेऊन दररोज ६० किलोमीटर चालत जाणाऱ्या व्यक्तीचे उदाहरण सांगत उपदेशाचे मर्म समजून घेण्याची गरज स्पष्ट केली.
ऑस्ट्रियातील व्हिएन्ना जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टर इग्नाझ सेमेलविस यांच्या ‘हात धुवा’ या साध्या उपदेशाचे उदाहरणही त्यांनी दिले. हात न धुता प्रसूती केल्यामुळे महिलांना होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर हात धुण्याचा आग्रह धरण्यात आला आणि त्यानंतर मृत्यूचे प्रमाण कमी झाले. भारतातही हात-पाय धुण्याची परंपरा प्राचीन काळापासून असल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘हात धुण्याबरोबर मनही धुणे आवश्यक आहे. संकुचित आणि दूषित विचारांऐवजी सर्वसमावेशक विचार स्वीकारले पाहिजेत. एखादा समाज किंवा संप्रदाय श्रेष्ठ आणि दुसरा कनिष्ठ असल्याचे सांगून विद्वेष निर्माण करणाऱ्या भाषणांपासून दूर राहिले पाहिजे. अशा विचारांमुळे माणसामाणसांत भिंती उभ्या राहतात. मानवतेचे कल्याण साधणारा उपदेश हाच खरा सद्धर्म आहे,’’ असे महाराजांनी सांगितले.
पितृपक्षाचे महत्त्व स्पष्ट करताना त्यांनी संयम, आत्मपरीक्षण आणि कर्माची जाणीव ठेवण्याचे आवाहन केले. मृत्यूनंतर शरीराचे ‘पोस्टमार्टम’ होते; त्यापूर्वीच माणसाने स्वतःच्या अंतरंगाचे ‘ऑटोप्सी’ म्हणजे आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये सुधारणा करावी. धर्माने वागून कल्याणकारी मार्ग स्वीकारावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमास सिंधुदुर्ग, गोवा, पुणे, मुंबई, कोल्हापूर, कर्नाटक, राज्यांतील हजारो भाविक उपस्थित होते.
फोटो:-
आडी येथे प्रवचन देताना परमपूज्य परमात्मराज महाराज.

You cannot copy content of this page