आयशर वाहनासह दोघांना अटक; सावंतवाडी पोलिसांची सातोळी बावळट येथे कारवाई..

⚡सावंतवाडी ता.२६-: गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्या दोघांना सावंतवाडी पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून सुमारे २२ लाख ८० हजार रुपये किमतीची दारू आणि १५ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन, असा एकूण ३७ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २६ सप्टेंबर रोजी रात्री सातोळी बावळट येथे बांदा-आंबोली मार्गावर करण्यात आली.
या प्रकरणी एकनाथ सुखदेव इंगोले (वय २६, रा. बामणी, ता. सांगोला, जि. सोलापूर) आणि भीमराव बंडू शेटे (वय २६, रा. सिकंदर टाकळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांना अटक करण्यात आली आहे. तर प्रविण दत्ताराम खांडेकर (वय २७, रा. निजामपूर, ता. सांगोला, जि. सोलापूर) हा संशयित घटनास्थळावरून निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून MH-45-AF-1540 क्रमांकाच्या आयशर वाहनातून गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात बेकायदेशीररीत्या आणली होती. वाहनाची तपासणी केली असता HIGHLAND DISTILLERIES, HONDA GOA असे लेबल असलेले ३८० बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये Royal Impact Grain Whiskyच्या ७५० मिलीच्या १२ सीलबंद बाटल्या होत्या. जप्त दारूची किंमत सुमारे २२ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५७/२०२६ नोंद करण्यात आला असून, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम ६५ (अ), (ई), ८१ व ८३ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार रुक्मागद मुंडे यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. तपास PSI प्रमोद पाटील करीत आहेत. कारवाईदरम्यान पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, PSI प्रमोद पाटील, PSI अविनाश पाटील तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे PI श्री. मुल्ला यांनी घटनास्थळी भेट दिली.
रात्री ११.३० ते पहाटे १.३० या वेळेत ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.
