Headlines

गोव्यातील मोठ्या रकमेच्या ऑनलाइन चलनांचा पुनर्विचार करा..

श्रेयस मुंज: वन टाइम सेटलमेंटसह पत्रादेवी येथे तक्रार व तांत्रिक सहाय्य कक्ष सुरू करण्याची मागणी

सावंतवाडी : गोव्यात पर्यटकांना ऑनलाइन चलन प्रणालीद्वारे मोठ्या रकमेची चलने होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अशा चलनांचा शासनाने पुनर्विचार करून वन टाइम सेटलमेंटची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रेयस मुंज यांनी पंतप्रधान, गोव्याचे मुख्यमंत्री आणि गोव्याचे पर्यावरण मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.

गोवा हे देशातील प्रमुख पर्यटनस्थळ असून महाराष्ट्रासह विविध राज्यांतून मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात येतात. मात्र, ऑनलाइन चलन प्रणालीतील तांत्रिक दोष अथवा चुकीच्या प्रक्रियेमुळे काही पर्यटकांना १० हजार, १७ हजार, २० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेची चलने झाल्याच्या तक्रारी आहेत. मोठ्या रकमेची अशी चलने झाल्यास त्याचा आर्थिक भार संबंधित नागरिकांवर पडत असून, चलन भरण्यासाठी पुन्हा गोव्यात यावे लागल्यास प्रवासासह अतिरिक्त खर्चाचाही सामना करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर मोठ्या रकमेच्या चलनांचा पुनर्विचार करून काही प्रमाणात दंडकपात करावी आणि कमी रकमेवर एकदाच भरणा करण्याची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच गोव्याला लागून असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील नागरिकांसाठी विशेष सवलत देण्याची मागणीही मुंज यांच्याकडून करण्यात आली आहे.
तांत्रिक दोषामुळे अथवा चुकीच्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेली चलने तपासून ती रद्द करण्याची कार्यवाही करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. कायद्याची अंमलबजावणी आवश्यक असली तरी तांत्रिक त्रुटींमुळे नागरिकांना अनावश्यक आर्थिक व मानसिक त्रास होऊ नये, तसेच गोव्याच्या पर्यटन क्षेत्राबाबत नागरिकांचा विश्वास कायम राहावा, यासाठी शासनाने या विषयाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातून गोव्यात प्रवेश करणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी पत्रादेवी येथे ऑनलाइन चलन तक्रार व तांत्रिक सहाय्य कक्ष सुरू करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणीही करण्यात आली आहे. या कक्षामध्ये चलनाची माहिती, तक्रार नोंदणी, तांत्रिक तपासणी तसेच तातडीचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page