⚡बांदा ता.१८-: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांदा शहरातील एका चौकात लावण्यात आलेला ‘आभार!’ असा भला मोठा फलक सध्या शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत आहे. या फलकावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, माजी उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत व तंटामुक्तीअध्यक्ष ज्ञानेश्वर सावंत यांची छायाचित्रे झळकत आहेत.
फलकावर ‘आभार!’ असा ठळक मजकूर देण्यात आला असून, गणेशोत्सवाच्या शुभेच्छांच्या वातावरणात हा फलक विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. बांदा शहरातील मुख्य रस्त्यालगत लावण्यात आलेल्या या फलकामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष त्याकडे वेधले जात आहे.
विशेष म्हणजे, याच परिसरात गणेशोत्सवाच्या शुभेच्छांचे विविध फलक, जाहिराती आणि राजकीय संदेश झळकत असल्याने शहरातील वातावरण सध्या गणेशोत्सवमय झाले आहे. मात्र, केवळ ‘आभार!’ असा ठळक संदेश असलेल्या या फलकामागील नेमका संदर्भ काय, याबाबत शहरवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
बांदा शहरात ‘आभार’चा फलक चर्चेत…
