Headlines

राणेंच्या दीड वर्षांच्या कामगिरीवर भाजप समाधानी…

प्रभाकर सावंत : मत्स्य, पर्यटन, रोजगार, तंत्रज्ञानासह पायाभूत सुविधांना गती; कार्यकर्त्यांनाही मिळाले बळ..

⚡ओरोस, ता. २८-: मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा, ५६० कोटींचा विकास आराखडा, जिल्ह्यातील पहिला जहाज बांधणी प्रकल्प, शिरोडा-वेलागर येथे ‘ताज’ पंचतारांकित हॉटेल, प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर, २८२ शिक्षकांची भरती, पर्यटन आणि पाणंद रस्त्यांसह विविध क्षेत्रांत घेतलेले निर्णय यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांच्या दीड वर्षाच्या कामगिरीबाबत भाजप संघटना समाधानी आहे. त्यांच्या कामामुळे विकासाला गती मिळण्याबरोबरच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही बळ मिळत आहे, असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सांगितले.
गुरुवारी सकाळी सिंधुदुर्गनगरी येथील भाजपच्या ‘वसंत स्मृती’ जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते.
सावंत म्हणाले, ‘‘२०२२ मध्ये रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने भाजपकडे प्रथमच जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी प्रमुख रेल्वेस्थानकांचा कायापालट केला. तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामे करून जिल्ह्यात विकासाची गती निर्माण केली. हीच गती पकडून नितेश राणे यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या सर्वच क्षेत्रांत आघाडी घेतली आहे.’’

मत्स्य व्यवसायापासून जहाजबांधणीपर्यंत
मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा निर्णय हा कोकणातील मच्छीमारांसाठी महत्त्वाचा ठरल्याचे सावंत यांनी सांगितले. जिल्हा नियोजनमधून सुमारे ३६० कोटी आणि सिंधुरत्न समृद्ध योजना २.० मधून २०० कोटी अशा एकूण ५६० कोटींच्या विकास आराखड्याला चालना मिळाली आहे. तळवणे येथे ‘झेन्वा मरीन सर्व्हिसेस’च्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिल्या जहाज बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. या प्रकल्पातून मुंबई वॉटर मेट्रोसाठी सुमारे २०० बोटी तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असा दावा त्यांनी केला.

‘ताज’मुळे पर्यटनाला नवी ओळख
शिरोडा-वेळागर येथे इंडियन हॉटेल्स कंपनीच्या माध्यमातून जागतिक दर्जाचा पंचतारांकित ‘ताज’ हॉटेल प्रकल्प मंजूर होऊन त्याचे काम सुरू झाले आहे. पर्यटन क्षेत्राला यामुळे मोठी चालना मिळणार आहे. नापणे येथील काचेचा पूलही जिल्ह्याच्या पर्यटनासाठी महत्त्वाची उपलब्धी ठरल्याचे सावंत यांनी नमूद केले. जिल्हा परिषद आणि ‘महाप्रीत’ यांच्यात करार करून शाळा, अंगणवाड्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

प्रशासनात ‘एआय’; २८२ शिक्षकांची भरती
प्रशासकीय कामकाज अधिक वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करणारा सिंधुदुर्ग हा देशातील पहिला जिल्हा ठरला, असे सावंत यांनी सांगितले. जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी ‘पवित्र’ प्रणालीद्वारे २८२ प्राथमिक शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. सिंधुदुर्गनगरीतील रहिवाशांना जवळपास तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर हक्काच्या जमिनीचे सातबारा उतारे देण्याचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे.

स्थानिक रोजगाराला प्राधान्य
जहाज बांधणी आणि पर्यटन प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार देण्यावर भर दिला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने ७३ उमेदवारांना नियुक्तिपत्रे दिली, तर गरजू शेतकऱ्यांसाठी कर्जात दोन टक्के सवलतीची योजना राबविण्यात आली असल्याचे सावंत यांनी सांगितले. नांदगाव रेल्वेस्थानकानजीक कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी भूखंड घेऊन मोठे, अत्याधुनिक मार्केट यार्ड उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे जिल्ह्यातील कृषी व्यापाराला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुपोषणात घट; १२५ क्षयरुग्ण दत्तक
जिल्ह्यातील तीव्र कुपोषित (SAM) बालकांची संख्या मार्च २०२५ मध्ये ४७ होती. ती मार्च २०२६ मध्ये २३ पर्यंत खाली आणण्यात यश आले आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील १२५ क्षयरुग्णांना दत्तक घेण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी ‘नशामुक्त सिंधुदुर्ग’ मोहीम, सुरक्षित प्रवासासाठी विशेष रस्ते मोहीम तसेच सागरी सुरक्षेसाठी जिल्ह्यातील १४ संवेदनशील लँडिंग पॉइंटवर ‘पोर्ट केबिन’ उभारण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

पाणंद रस्त्यांचा प्रश्नही मार्गी
शेती पाणंद रस्त्यांचा प्रश्न सिंधुदुर्गने राज्यात सर्वप्रथम ठोसपणे मांडला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांच्या वाटेच्या समस्या सोडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले असून, पाणंद रस्ते आता शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहेत, असे सावंत म्हणाले. पीक विम्यातील त्रुटी दूर करणे, फळपीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणे, किनारी भागातील रस्ते, केंद्र व राज्य शासनाच्या योजना तसेच कर्जमाफीसारख्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. रवींद्र चव्हाण यांनी सुरू केलेल्या विकासाच्या वाटचालीला नितेश राणे यांनी अधिक व्यापक स्वरूप दिले असून ‘विकसित सिंधुदुर्ग’ हेच त्यांच्या कामाचे लक्ष्य आहे, असे सावंत यांनी सांगितले.

फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी:

You cannot copy content of this page