४० वर्षांची प्रतीक्षा संपली ;घाटरस्त्याला केंद्राची मंजुरी
कुडाळ : तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या घोटगे-सोनवडे घाटरस्त्याच्या प्रकल्पाला केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा करत जोरदार जल्लोष केला. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी राणे कुटुंबीयांचे विशेष आभार मानले.
घोटगे-सोनवडे घाटमार्ग पूर्ण व्हावा, यासाठी गेल्या चार दशकांपासून सातत्याने मागणी आणि संघर्ष सुरू होता. या मागणीसाठी कै. प्रा. महेंद्र नाटेकर आणि कै. सुशांत दळवी यांनी उपोषण करून तीव्र लढा दिला होता. त्यानंतर तत्कालीन आमदार नारायण राणे यांनीही या मार्गासाठी भरीव पाठपुरावा केला.
अखेर या प्रदीर्घ संघर्षाला यश आले आहे. आमदार निलेश राणे यांनी हा प्रलंबित प्रश्न विधिमंडळ तसेच प्रशासकीय स्तरावर सातत्याने लावून धरत मार्गाच्या मंजुरीसाठी महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला. त्यातून या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
दरम्यान, रस्त्याच्या प्रत्यक्ष कामासाठी पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येणार आहेत. नवीन आराखडा व तांत्रिक मान्यता निश्चित करणे तसेच केंद्रीय पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, जनसुनावणी आणि भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
घोटगे-सोनवडे घाटरस्ता पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहतूक आणि दळणवळणाला मोठी चालना मिळण्यासोबतच व्यापार, उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. या मार्गामुळे परिसराच्या विकासाला वेग मिळेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
मंजुरीनंतर झालेल्या आनंदोत्सवात गणेश बुटाले, सचिन तेली, आशिकेश शेटये, चेतन ढवळ, नारायण गावडे, जनार्दन गुरव, बाळा राणे, अमित मढव, बाळकृष्ण मढव, उमेश घाडी, रामा तावडे यांच्यासह परिसरातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
