Headlines

बांदा महसूल मंडळ कार्यालयातील अनियमित उपस्थितीवर ऋतिका नाईक आक्रमक…

तहसीलदारांकडे निवेदन; अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती व नागरिकांची कामे वेळेत करण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा..

⚡बांदा.ता.१५-: बांदा येथील महसूल मंडळ कार्यालयात मंडळ अधिकारी व कर्मचारी हे नियमितपणे उपस्थित राहत नसल्याने महसूल विषयक कामे घेऊन येणाऱ्या जनतेला त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करण्याची मागणी बांदा पंचायत समिती सदस्य सौ ऋतिका नाईक यांनी निवेदनाद्वारे सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बांदा शहरातील तलाठी कार्यालयात संबंधित अधिकारी व कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याने विविध शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक नागरिकांना कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागत असून वेळ आणि आर्थिक खर्चही सहन करावा लागत आहे. याबाबत चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी तसेच नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत त्यांना सक्त सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा याप्रकरणी उच्चस्तरीय तक्रार करून आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
यावेळी ठाकरे शिवसेना बांदा शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, ओंकार नाडकर्णी, विठ्ठल वाळके आदी उपस्थित होते. याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सक्त सूचना देण्याचे आश्वासन तहसीलदार श्री पाटील यांनी दिले.
फोटो:-
सावंतवाडी येथे तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देताना ऋतिका नाईक. सोबत साईप्रसाद काणेकर व इतर.

You cannot copy content of this page