Headlines

पाटबंधारे विभागाची श्वेतपत्रिका काढा; आमदार निलेश राणे यांची मागणी, पालकमंत्र्यांचे तात्काळ आदेश

ओरोस, ता. १५ :
जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार निलेश राणे यांनी या विभागाची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. विभागामार्फत कोट्यवधी रुपयांची कामे होत असली तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना दिसत नसल्याचा आरोप करत “कोल्हापूर टाईप बंधारे नेमके काय आणि त्याचा फायदा किती?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. या मागणीची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर यांना लघु पाटबंधारे विभागाची श्वेतपत्रिका तयार करण्याचे आदेश दिले.
बुधवारी सिंधुनिती सभागृहात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विकासकामांवर जोरदार चर्चा झाली. बैठकीला खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आमदार निरंजन डावखरे, पालक सचिव वीरेंद्र सिंह, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
लघु पाटबंधारे विभागावर टीका करताना आमदार निलेश राणे म्हणाले की, विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो; मात्र त्याचा प्रत्यक्ष परिणाम जिल्ह्यात दिसून येत नाही. त्यामुळे विभागातील कामांची सखोल चौकशी करून आतापर्यंत राबविण्यात आलेल्या योजनांची वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी.

You cannot copy content of this page