आरोस गावातील बीएसएनएल सेवा सुरळीत करा…

मनसे विभाग प्रमुख मंदार नाईक : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

*💫बांदा दि.०१-:* आरोस गावातील बीएसएनएल टॉवरची कार्यक्षमता कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच वर्क फ्रॉम होम करणाऱ्या युवकांना रेंजअभावी नुकसान सहन करावे लागत आहे. गावात टॉवर असूनही योग्यप्रकारे रेंज मिळत नाही, तसेच लँडलाईन फोन सुद्धा कधी सुरू तर कधी बंद अवस्थेत असतात. त्यामुळे आरोस गावात बीएसएनएल सेवेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. तरी बीएसएनएलने याची त्वरित दखल घेऊन सेवा सुरळीत करावी, अशी मागणी मनसे विभागप्रमुख मंदार नाईक यांनी केली आहे. श्री. नाईक म्हणाले की, ग्राहक आपली बिले वेळेत भरतात पण त्यांना बीएसएनएलकडून योग्य सेवा दिली जात नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन लावल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. वायफाय सेवासुद्धा धीम्या गतीने असल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याकडे अधिकाऱ्यांसह सरकारचे सुद्धा लक्ष नसल्याचे ते म्हणाले. आरोस गावात भारत संचार निगमच्या इंटरनेट सेवा असून नसल्यासारखी आहे. चार पाच दिवसापासून गावातील काही ग्राहकांची इंटरनेट सेवा विस्कळीत असून त्यांचे नुकसान होत आहे. तसेच शिक्षण, वर्क फ्रॉम होम व व्यवसायावरही परिणाम होत तीन तेरा वाजले आहेत. त्यामुळे बीएसएनएलने याची त्वरित दखल घ्यावी व सेवा सुरळीत करावी अन्यथा घेराव घालण्याचा इशारा मनसे आरोस विभाग प्रमुख मंदार नाईक यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page