Headlines

शिक्षण, सहकार आणि समाजकारणातील स्व. विकास सावंत यांचे योगदान प्रेरणादायी…

विक्रांत सावंत: प्रथम स्मृती दिनानिमित्त राणी पार्वतीदेवी हायस्कूलमध्ये स्मरणसोहळा संपन्न..

⚡सावंतवाडी ता.१५-: स्व. भाईसाहेब सावंत यांच्या नेतृत्वाचे संस्कार घेऊन स्व. विकास सावंत सुमारे तीन दशके शिक्षण, सहकार, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रापर्यंत त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि विधायक मार्गदर्शनाने वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे निर्व्यसनी, शिस्तबद्ध आणि संस्कारक्षम जीवन आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आदर्श आहे. त्यांन उभा केलेला शैक्षणिक वटवृक्ष आज हजारो विद्यार्थ्यांना ज्ञान आणि संस्कारांची सावली देत असल्याचे उद्गार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी काढले. ‘विकासभाई–एक आश्वासक पर्व’ या स्मरणसोहळ्यादरम्यान अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

शिक्षण, सहकार, समाजकारण आणि राजकारण या विविध क्षेत्रांत आपल्या दूरदृष्टीपूर्ण कार्याचा ठसा उमटविणारे कै. विकास सावंत यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे ‘विकासभाई–एक आश्वासक पर्व’ हा स्मरणसोहळा आयोजित करण्यात आला. अनेकांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, मूल्यनिष्ठ नेतृत्वाचा आणि माणसे जोडणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा मान्यवरांनी गौरव केला. यावेळी अध्यक्षीय मनोगतात श्री. सावंत म्हणाले, मी संस्थेचा अध्यक्ष म्हणून कार्यरत असलो, तरी या वटवृक्षाचे खरे राखणदार संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, शालेय समिती अध्यक्ष आणि सर्व सदस्य आहेत. स्व. विकास सावंत यांच्या विचारांचा वारसा आणि वसा जपत विद्यार्थ्यांचे भवितव्य अधिक उज्ज्वल व संस्कारक्षम करण्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच संस्थेचे सचिव, माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक यांनी विकास सावंत यांच्या खंबीर नेतृत्वाच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तुम्ही निडरपणे आणि प्रामाणिकपणे काम करा. कोणत्याही परिस्थितीत मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,’ असा विश्वास देण्याचे काम विकास सावंत यांनी केले. कोणतीही समस्या असो, तिचा कायदेशीर, प्रशासकीय आणि व्यावहारिक अंगाने अभ्यास करून ते योग्य मार्गदर्शन करीत. त्यामुळे विकास सावंत म्हणजे प्रत्येक समस्येवर अभ्यासपूर्ण उपाय आणि मार्गदर्शन देणारा ‘चालता-बोलता विश्वकोश’ होते, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, संस्थेचे सदस्य प्रा. सतीश बागवे यांनी विकास सावंत यांच्या संस्थेप्रती असलेल्या समर्पणाचा उल्लेख केला. ते शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आणि त्यांच्या वैयक्तिक प्रगतीसाठीही सातत्याने प्रयत्नशील असत. संस्थेच्या विकासकामात त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारण्यापासून ते प्रत्येक कामाचे बारकाईने निरीक्षण करण्यापर्यंत ते स्वतः सहभागी होत. आज उभ्या असलेल्या या संस्थेच्या वाळूच्या प्रत्येक कणावर, प्रत्येक विटेवर आणि खडीच्या प्रत्येक दगडावर विकास सावंत यांच्या कष्टांचे आणि समर्पणाचे नाव कोरलेले आहे. डॉ. नितीन सावंत यांनी पहिल्याच भेटीत समोरच्या व्यक्तीला भारावून टाकणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे विकास सावंत होते. शिक्षण, सहकार, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रांतील त्यांचे योगदान मोजता न येणारे आहे. सर्वसामान्य आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी दूरदृष्टीने कार्य करणारे ते खऱ्या अर्थाने शिक्षणमहर्षी होते. त्यांचे अनपेक्षित जाणे ही केवळ एका संस्थेची नव्हे, तर विविध क्षेत्रांची मोठी हानी असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, स्व. विकास भाई सावंत यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा यामधील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. चित्रकला स्पर्धेत अनुक्रमे कु . युगा अनिल गुंजाळ, कु. कार्तिकी रामा सावंत ,शुभ्रा मनोज खाडिलकर,कुमार सोहम बापूशेठ कोरगावकर ,कुमार गौरांग सदाशिव सावंत, कु. कुमारी रेवा राकेश बांदेकर,कु. नमिता मिलिंद मडव,कु. मृण्मयी पाटील तर वक्तृत्व स्पर्धेत कु जान्हवी विश्वास पाटील , कु. प्रणाली राजन घाटकर,कु. अस्मी प्रवीण मांजरेकर, कु रेश्मा संदेश पालव, कु. प्रज्ञा तुषार मोर्ये हे विद्यार्थी बक्षिसाचे मानकरी ठरले .
या स्मरणसोहळ्यास शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, तसेच संस्थेचे सदस्य प्रा. सतीश बागवे, संदीप राणे, चंद्रकांत सावंत, वसुधा मुळीक, छाया सावंत, स्नेहा परब, आणि डॉ. नितीन सावंत, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, संदीप भराडे तसेच मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, प्रभारी मुख्याध्यापक डॉ. सुमेधा नाईक, प्रभारी उपप्राचार्य सविता माळगे, पर्यवेक्षक नामदेव मुठे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. वामन ठाकूर यांनी केले. तर आभार प्र. मुख्याध्यापक डॉ. सुमेधा नाईक यांनी मानले.

You cannot copy content of this page