Headlines

सातत्य आणि कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली !

आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन किप्रॉप यांचे एसआरएम कॉलेजमध्ये मार्गदर्शन

कुडाळ : सातत्य आणि कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू विल्सन किप्रॉप यांनी केले. येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे केनियन लांब पल्ल्याचे धावपटू विल्सन किप्रॉप यांच्याशी विद्यार्थ्यांचा प्रेरणादायी संवाद आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे केनियन धावपटू विल्सन किप्रॉप यांनी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये केनियाचे प्रतिनिधित्व केलेले असून, २०१० आफ्रिकन अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक आणि जागतिक अर्ध-मॅरेथॉन स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक मिळविले आहे. महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमधील विद्यार्थ्यांशी झालेल्या मुक्त संवाद सत्रात विविध प्रश्नांना उत्तरे देताना विल्सन किप्रॉप यांनी सातत्य आणि कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली आहे असा प्रेरणादायी संदेश दिला. यश संपादन करण्यासाठी नियमित सराव, शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन यांचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रमाला क.म.शि.प्र.मंडळाचे संस्थेचे सरकार्यवाह अनंत वैद्य, सहकार्यवाह महेंद्र गवस तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध उद्योजक अजित राणे आणि सौ. राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
क.म.शि.प्र.मंडळाचे संस्थेचे सरचिटणीस अनंत वैद्य यांच्या शुभहस्ते आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन किप्रॉप यांचा भारतीय संस्कृतीनुसार शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
तत्पूर्वी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विल्सन किप्रॉप यांचे स्वागत करण्यात आले. प्रवेशद्वारावर विल्सन किप्रॉप यांची रेखाटलेली रांगोळी विल्सन किप्रॉप यांना खूप भावली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. मसूरकर, क्रीडा प्रशिक्षक क्रिस्टन रॉड्रिग्स तसेच क्रीडा विभागातील सर्व समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. कमलाकर चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. गीताश्री ठाकूर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.

You cannot copy content of this page