बांदा/प्रतिनिधी
सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा यांच्या वतीने यंदाच्या आषाढ महिन्यानिमित्त भव्य ‘आषाढ महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक १७ जुलै रोजी रात्री ७ वाजता आनंदी मंगल कार्यालय, कट्टा कॉर्नर, बांदा येथे हा धार्मिक-सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे.
या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘सूर्यास्त सूर्योदय’ हा महान पौराणिक, संघर्षमय संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग होणार आहे. पारंपरिक मालवणी दशावतार कलेचा थरार, प्रभावी अभिनय, नेत्रदीपक वेशभूषा आणि संगीताच्या साथीने सादर होणारा हा प्रयोग रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
या नाट्यप्रयोगात प्रतीक कलिंगण (गणपती), चंद्रकांत गावडे (रिद्धी-सिद्धी), प्रशांत मयेकर (शनी), गौरव शिर्के (शंकर), सुयश ठाकूर (गंधर्व), उदय मोर्ये (सुमाली), योगेश कोंडूरकर (नारद), सागर गावकर (मंगळ), नारायण आशयेकर (सूर्य), महेंद्र कुडव (कश्यप), मोरेश्वर सावंत (इंद्र), गोट्या येरागी (संज्ञा) आणि सुधीर तांडेल (नीलमंदा) हे कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत.
संगीत साथीसाठी हार्मोनियमवर मयूर गवळी, मृदंगमणी पियुष खंदारे आणि झांजवर विनायक सावंत हे कलाकार साथ देणार आहेत. श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर-कुडाळ यांच्या विशेष सहकार्याने हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
आषाढ महोत्सवानिमित्त आयोजित या भव्य दशावतार नाट्यप्रयोगाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, कट्टा कॉर्नर, बांदा यांनी केले आहे.
आषाढ महोत्सवानिमित्त बांद्यात ‘सूर्यास्त सूर्योदय’ संयुक्त दशावतार रंगणार…
