जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दोडामार्ग इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपण समारंभ संपन्न…

⚡दोडामार्ग, ता.०५-: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग येथे वृक्षारोपण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सदस्य श्री. विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून, स्वर्गीय विकासभाई सावंत यांच्या प्रेरणेतून पर्यावरण संरक्षणाची ही चळवळ अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
“आजची आपली प्रत्येक कृती उद्याचे भविष्य घडवणार आहे. आपण जपलेला निसर्गच भावी पिढीचे जीवन फुलवणार आहे. हवा, पाणी आणि जमीन ही केवळ आपली मालमत्ता नसून पुढील पिढ्यांची अमूल्य ठेव आहे. शाश्वत विकासाच्या माध्यमातूनच निसर्गसंपत्तीचे जतन करता येईल,” असा संदेश या उपक्रमाद्वारे देण्यात आला.
हा वृक्षारोपण समारंभ दि. ५ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शालेय परिसरात संपन्न झाले. या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी तसेच पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणासारखे उपक्रम काळाची गरज असून, प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page