व्यापऱ्यांच्या हप्ते वसुलीसाठी बँकांचा तगादा;भाजप उद्योग व्यापार जिल्हाध्यक्ष केनवडेकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
*💫मालवण दि.२८-:* गेल्या वर्षापासून सिंधुदुर्गातील व्यापारी लॉक डाऊनमुळे आर्थिक खाईत लोटला असतानाही बँका कर्जाच्या हप्त्यासाठी थांबत नाहीत. काही बँकांनी कारवाई करायला सुरुवात केली असून व्यापार बंद असल्याने काही व्यापाऱ्यांचा मालही वापराविना खराब झाला आहे. आता तौक्ते वादळाने किनारपट्टीच्या व्यापाऱ्यांचे बरेच नुकसान झाले असून या सर्व गोष्टींचा विचार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापार १ जून पासून खुला करण्याची मागणी भाजपच्या उद्योग व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉगडाऊन सुरु आहे. काही तालुक्यातील बाजारपेठेतील व्यापारी बांधवांनी जनता लॉगडाऊन मध्ये सहकार्य केले आहे. ४५ दिवस व्यापार उद्योग बंद आहेत. मागील वर्षापासून व्यापारी आर्थिक खायीत लोटला आहे. बँका कर्जाच्या हप्त्यासाठी थांबत नाहीत. काही बँकांनी कार्यवाही करायला सुरुवात केली आहे. काही व्यापाऱ्यांचा माल वापराविना खराब झाला आहे. तौक्ते वादळाने किनार पट्टीच्या व्यापाऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. छोटे व्यापारी, पानपट्टी व्यापारी, केशकर्तनालय, कापड व्यापारी, चप्पल दुकानदार, सौंदर्य प्रसाधन यांचा पूर्ण व्यवसाय संपला आहे. असणारी बचत व्यापारात घालुन व्यवसाय सुरु केला असतानाच दुसऱ्या लॉगडाऊनमुळे व्यापारी आर्थिक दृष्ट्या संपला आहे. विद्युत बील, घरपट्टी, टॅक्स, कामगारांचा पगार देताना नाकीनऊ आले आहेत. वरील सत्य परिस्थितीचा विचार करुन १ जून पासून व्यापार खुला करावा अशी मागणी श्री. केनवडेकर यांनी केली आहे.
