अन्यथा प्रोत्साहनपर लाभाला मुकावे लागेल:बांदा विकास सोसायटीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांचे शेतकऱ्यांना आवाहन..
⚡बांदा ता.२३-: राज्य शासनाच्या अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत यावर्षीची कर्जे कर्जमाफिस पात्र नसल्याने शेतकऱ्यांनी चालू वर्षातील वसुलपात्र पीककर्जाची मुदतीत परतफेड करावी, अन्यथा प्रोत्साहनपर लाभ योजनेपासून वंचित राहावे लागेल, असे आवाहन बांदा विकास सोसायटीचे अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी केले आहे.
राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी योजना जाहीर केली असून, ३० जून २०२५ अखेर थकीत असलेल्या तसेच ३० सप्टेंबर २०२५ अखेर दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे.
१ जुलै २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या कर्जाची परतफेड मुदत ही ३० जून २०२६ पर्यंत आहे. त्यामुळे हे कर्ज कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरणार नाही. अन्यथा संबंधित शेतकरी प्रोत्साहनपर लाभासाठी अपात्र ठरणार असल्याचे श्री सावंत यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे थकीत कर्जदारांनी लवकरात लवकर मुदतीत कर्जफेड करावी असे आवाहन श्री सावंत यांनी केले आहे.
