८५ जिल्हा परिषद शाळा होणार ‘स्मार्ट…

दोन कोटींच्या निधीतून इंटरॅक्टिव्ह बोर्ड वाटप..

ओरोस ता २१
जिल्हा परिषदेच्या ८५ शाळा स्मार्ट होणार आहेत. जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त दोन कोटी अनुदानातून स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड या शाळांना प्रदान करण्यात येणार आहेत. मोठ्या पटसंख्येच्या तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमात अग्रेसर असलेल्या शाळांना आधुनिक शिक्षणाची गरज असलेले हे साहित्य पुरविले जाणार आहे, अशी माहिती गुरुवारी झालेल्या शिक्षण समिती सभेत सभाध्यक्ष प्रितेश राऊळ यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची मे २०२६ ची मासिक सभा गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात समिती सभापती प्रितेश राऊळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी जयप्रकाश परब, समिती सदस्य प्रमोद रावराणे, प्राची इस्वलकर, श्रावणी रावराणे, यज्ञा साळगावकर, अपर्णा सातोसकर, रामा गवस, नितीन राऊळ आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा अभिनंदन ठराव घेण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातील किती शाळांना प्रोजेक्टरची सुविधा उपलब्ध आहे ? असा मागील शिक्षण समिती सभेत सदस्या साळगावकर यांनी प्रश्न केला होता. त्याला उत्तर देताना प्रशासनाने तालुकानिहाय शाळा संख्या उपलब्ध असलेल्या प्रोजेक्टरची संख्या वाचून दाखविली. त्यावेळी स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड शाळांना पुरविण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून दोन कोटी रुपये अनुदान मंजूर झालेले आहेत. एका स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्डची किंमत अडीज कोटी रुपये आहे. त्यानुसार ८५ शाळांना स्मार्ट इंटरॅक्टिव्ह बोर्ड वितरित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, यासाठी सर्वाधिक पटसंख्येच्या शाळा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमात अग्रेसर असलेल्या शाळांचा समावेश करण्याचे ठरविण्यात आले आहे, असे सांगितले.

You cannot copy content of this page