तारकर्ली समुद्रात पुण्यातील तरुण बेपत्ता…

⚡मालवण ता.२१-:
तारकर्लीच्या समुद्रात आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास समुद्र स्नानाचा आनंद लुटणाऱ्या दोन तरुणांपैकी समर्थ गणेश कर्पे (वय २२, रा. आंबेगाव पुणे) हा तरुण समुद्रात बेपत्ता झाला असून त्याच्या समवेत समुद्र स्नान करणारा ऋषभ रविकिरण कदम (वय २७, रा. धनकवडी, पुणे) हा किनारा गाठण्यात सुदैवाने यशस्वी झाल्याने तो बचावला आहे. समुद्रात बेपत्ता झालेल्या समर्थ कर्पे याचा रात्री उशिरा पर्यंत स्थानिकांनी शोध घेतला, मात्र तो सापडू शकला नाही.

या संबधीचे अधिक वृत्त असे की, पुणे येथील रेवती एंटरप्रायझेस याठिकाणी नोकरीस असलेले ऋषभ रविकिरण कदम आणि समर्थ गणेश कर्पे हे दोघे काल २० मे रोजी ते सकाळी जिल्ह्यात दाखल झाल्यावर ओरोस येथील समाज कल्याण विभाग कार्यालयात आपले कार्यालयीन काम आटोपून ते दोघेही मालवणच्या पर्यटनासाठी आले होते. आज तारकर्ली येथे एमटीडीसीच्या समोरील समुद्रात दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास समुद्रस्नानासाठी उतरले. समुद्र स्नानाचा आनंद घेत असताना एका मोठ्या लाटेच्या तडाख्यात हे दोघेही समुद्रात ओढले गेले. यावेळी दोघांनीही वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. दोघांनीही स्वतःला वाचविण्यासाठी जीवघेणी धडपड सुरु केली. या धडपडीत ऋषभ हा किनाऱ्याच्या दिशेने येऊ लागला. तर समर्थला समुद्राच्या लाटांनी आपल्या कवेत घेतले. हा प्रकार किनाऱ्यावर उभ्या असलेल्या वैभव खोबरेकर, संकेत तारी, दत्ताराज चव्हाण, महेंद्र चव्हाण, वैभव सावंत यांच्यासह इतरांनी समुद्राकडे धाव घेत ऋषभ कदम याला समुद्राबाहेर काढले. तर समुद्रात बेपत्ता झालेल्या समर्थ याचा स्थानिकांनी समुद्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडून आला नाही.

बचावलेल्या ऋषभ कदम याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी स्थानिकांनी १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले. मात्र सुमारे अर्धा तास होऊनही रुग्णवाहीका घटनास्थळी दाखल न झाल्याने अखेर आणखी वेळ न दवडता स्थानिक पर्यटन व्यावसायिक वैभव खोबरेकर व महेंद्र चव्हाण यांनी ऋषभ याला दुचाकीवर बसवून मालवणात आणत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी ऋषभ याच्यावर उपचार केल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर बनली होती.

यावेळी घटनास्थळी तसेच ग्रामीण रुग्णालयात मालवण पोलिसांनी हजर होत घटनेची माहिती घेतली. तर समुद्रात बेपत्ता झालेल्या समर्थ याचा रात्री उशिरापर्यंत स्थानिकांकडून शोध सुरु होता, मात्र तो सापडून आला नव्हता.

You cannot copy content of this page