महिलांची नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्याकडे मागणी:
प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, नागरिकांची अपेक्षा..
⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारलेले आणि शहराची ओळख मानले जाणारे ऐतिहासिक घड्याळ गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शहराची जान, शान आणि मान समजले जाणारे हे घड्याळ नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे सावंतवाडीच्या सौंदर्यावरही परिणाम होत आहे.
या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील काही महिला नागरिकांनी एकत्र येत नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले. शहराच्या मध्यवर्ती भागातील हे ऐतिहासिक घड्याळ तातडीने दुरुस्त करून पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महिलांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, हे घड्याळ केवळ वेळ दर्शविणारे साधन नसून सावंतवाडी शहराच्या वैभवाचे आणि ऐतिहासिक परंपरेचे प्रतीक आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांचेही या घड्याळाकडे विशेष आकर्षण असते. त्यामुळे या वास्तूचे जतन करून ते पूर्ववत कार्यान्वित करणे आवश्यक आहे.
नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी महिलांच्या मागणीची दखल घेत संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
सावंतवाडीकरांची शान असलेले हे ऐतिहासिक घड्याळ लवकरात लवकर सुरू होऊन पुन्हा एकदा शहराच्या सौंदर्यात भर पडेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
