विजयदुर्ग ते दोडामार्ग असा २०० कि.मी.चा प्रवास..
⚡मालवण ता.१९-:
आज पर्यावरणाची मोठी हानी होत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सातत्याने वादळाचे सावट निर्माण होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना अभूतपूर्व उष्णतेचा त्रास सहन करावा लागला. मानव प्राण्याने आरंभलेला पर्यावरणाचा ऱ्हास हेच यामागील एकमेव कारण आहे. आपले कोकण पूर्वीसारखे हिरवेगार, शांत आणि प्रसन्न राखायचे असेल तर पर्यावरण संवर्धनाशिवाय पर्याय नाही. हाच संदेश घेऊन, पर्यावरण जागृतीसाठी राष्ट्रसेवा दलाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ मे पासून ‘सागर ते सह्याद्री, बीज अंकुरे अंकुरे’ या संकल्पनेवर आधारित २०० किलोमीटर लांबीची सायकल यात्रा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्र सेवादलचे नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही यात्रा विजयदुर्ग ते दोडामार्ग अशी प्रवास करणार असून जिल्ह्यातील तरुणांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही वाळके यांनी केले
मालवण येथील हॉटेल चैतन्य येथे आयोजित पत्रकार परिषदेत नितीन वाळके यांनी सायकल यात्रेबाबत माहिती दिली. यावेळी श्री. वाळके म्हणाले, दि. २३ मे रोजी सकाळी ८ वाजता ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावरून या यात्रेची सुरुवात होईल. यावेळी जिल्ह्यातील पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी एकत्र येतील. पर्यावरण आणि शाश्वत पर्यटन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व ‘रान माणूस’ प्रसाद गावडे या यात्रेला उपस्थित राहतील. विजयदुर्गचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सरपंच यांच्या हस्ते या यात्रेचे शानदार उद्घाटन करण्यात येणार आहे.
यात्रेचा पहिला टप्पा २३ मे रोजी विजयदुर्ग पडेल वाडा – जामसडे मार्गे देवगड (दुपारचा विसावा). देवगडमध्ये सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला जाईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता देवगडहून कुणकेश्वर – मुणगे मार्गे यात्रा पहिल्या दिवसाच्या मुक्कामासाठी आचरे गावात पोहोचेल. दुसरा टप्पा आचरे ते मालवण मार्गे कुडाळ, तिसरा टप्पा कुडाळ – मठ – वेंगुर्ले मार्गे सावंतवाडी, चौथा व अंतिम टप्पा सावंतवाडी चराठा वाफोली -ओटवणे बांदा ते दोडामार्ग. २७ मे रोजी सकाळी दोडामार्ग येथील ‘गोवा मुक्ती संग्राम स्मारका’पाशी या यात्रेचा समारोप होईल. वाटेत विविध संस्थांद्वारे यात्रेचे स्वागत केले जाईल आणि विचारांची देवाणघेवाण होईल. या संपूर्ण यात्रेत भारतभरात पर्यावरण क्षेत्रात भरीव संशोधन व जागृतीचे काम करणारे नामवंत तज्ञ सहभागी होणार आहेत. यात प्रसाद गावडे (रान माणूस) पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यात प्रत्यक्ष सायकल यात्रेत सहभागी होणार असून ते चौक सभा घेतील. पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी आवाज उठवणारे प्रसिद्ध अभ्यासक रमेश गांवस यात्रेदरम्यान मार्गदर्शन करतील. पूर्णवेळ सेवादलचे कार्यकर्ते बाबासाहेब नदाफ यांचे मठ येथे विशेष व्याख्यान आयोजित केले आहे. गोव्यातील पर्यावरण तज्ज्ञ सॅबी रॉड्रिक्स यांची सावंतवाडी येथील जगन्नाथराव भोसले उद्यानात जाहीर सभा होईल. श्याम सुंदर सोन्नर महाराज हे दोडामार्ग येथे ‘संविधान’ विषयावर कीर्तन व प्रवचन सादर करतील. संत आणि वारकरी परंपरेत संविधानाची मूल्ये कशी अंतर्भूत आहेत, याचे सुंदर प्रबोधन ते करतील. पर्यावरण तज्ज्ञ सुजित डोंगरे हे समारोप प्रसंगी पर्यावरण विषयावर सविस्तर सादरीकरण करतील. श्री. मणी हे उपस्थित सर्व पर्यावरणप्रेमींना पर्यावरण रक्षणाची शपथ देतील, असे वाळके यांनी सांगितले.
जर आपण आताच पर्यावरण संवर्धनाचा विचार, प्रचार आणि प्रसार केला नाही, तर येत्या काही वर्षांत समुद्राकाठची गावे पाण्याखाली जाण्याचा मोठा धोका आहे, अशी भीती वाळके यांनी व्यक्त केली. ही हानी टाळण्यासाठी प्रत्येकाने सजग होणे गरजेचे आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी संपूर्ण यात्रेत अथवा आपल्या सोयीनुसार कोणत्याही एका टप्प्यात तरी सायकल स्वार म्हणून किंवा स्वागतकर्ते म्हणून सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन वाळके यांनी केले आहे.
