वीज कंपनीच्या कारभारावर नितीन वाळके यांची टीका..
⚡मालवण ता.१९-:
मालवण शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महावितरणच्या वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे. सातत्याने होणारा कमी दाबाचा पुरवठा, वारंवार वीज खंडित होणे आणि कधीतरी अचानक प्रचंड दाबाने विजेचा प्रवाह येणे, या चक्रव्यूहात जिल्ह्यातील ग्राहक होरपळून निघाले आहेत. वीज समस्येमुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाचे कंबरडे मोडले असून व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, विद्यार्थी, गृहिणी यांच्यासह सर्वसामान्य जनता यामुळे अत्यंत त्रस्त झाली आहे. महावितरणचे अधिकारी मात्र प्रत्येक वेळी थातूरमातूर कारणे पुढे करत जबाबदारी झटकत आहेत, असा घणाघाती आरोप पर्यटन व्यावसायिक आणि वीज समस्येचे अभ्यासक नितीन वाळके यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.
मालवण येथील हॉटेल चैतन्य येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी श्री. वाळके म्हणाले की, रोज सकाळी साधारणतः ७ ते ७.३० वाजल्यापासूनच जिल्ह्यात कमी दाबाने, म्हणजे अवघा १२० ते १३० व्होल्ट एवढाच वीजपुरवठा सुरू होतो. ही परिस्थिती दिवसभर कायम राहते. सध्या उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात कोकणचा मेवा चाखण्यासाठी आणि अथांग समुद्रकिनाऱ्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक सहकुटुंब दाखल झाले आहेत. मात्र, या वीज संकटामुळे होमस्टे आणि ‘निवास न्याहारी’ चालकांचे मोठे नुकसान होत आहे. अनेक पर्यटकांनी आपली आगाऊ आरक्षणे रद्द केली आहेत, तर आलेले पर्यटकही नाराज होऊन मध्येच सुट्टी सोडून परत जात आहेत. यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. ही संपूर्ण परिस्थिती केवळ आणि केवळ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे, कामचुकारपणामुळे आणि उत्तरदायित्वाच्या अभावामुळे निर्माण झाली आहे. एका बाजूला ग्राहकांना किमान मूलभूत सुविधा देता येत नसताना, दुसरीकडे मात्र महावितरणकडून अव्वाच्या सव्वा वीज बिले आणि आता त्यात नवीन ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ भरण्यासाठी ग्राहकांकडे सक्तीचा तगादा लावला जात आहे. हा जनतेवर सरळ-सरळ अन्याय आहे, असे वाळके म्हणाले.
सध्या पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून मान्सूनपूर्व पावसाचा नुसता शिडकावा झाला किंवा पावसाने थोडी जरी हुल उठवली, तरी तासनतास वीज गुल होते. जर मान्सूनपूर्व वातावरणामुळेच ही दैना उडाली असेल, तर डोळ्यांसमोर उभा असलेला अख्खा पावसाळा सिंधुदुर्गवासीयांनी कसा काढायचा? या चिंतेने संपूर्ण जिल्ह्याला ग्रासले आहे, असे वाळके यांनी नमूद केले.
वीज महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे आता सर्वसामान्य जनतेचा आणि व्यावसायिकांचा संयम सुटला आहे. वीज ग्राहकांनी आणि विशेषतः पर्यटन व्यावसायिकांनी महावितरणच्या भरवशावर राहू नये. त्यांच्या आशेवर आपले व्यवसाय उभे करू नका. या भ्रष्ट आणि अकार्यक्षम व्यवस्थेने आपल्यासमोर स्वतःची स्वतंत्र ऊर्जेची व्यवस्था करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय ठेवलेला नाही, हेच आजचे कटू सत्य आहे, असे श्री. वाळके यांनी स्पष्ट केले.
वीज समस्येवर महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून सुधारणा न केल्यास जिल्ह्यातील जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेवटी वाळके यांनी दिला.
