⚡बांदा, ता.१९-: इन्सुली कुडवटेंब मुख्य रस्ता ते इसवटी मार्ग या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे मार्ग बंद झाल्याच्या तक्रारीवरून इन्सुली येथील मधुकर कुडव यांनी सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे हा तोडगा निघाला.
सदर रस्त्यावरील अतिक्रमणाबाबत कारवाई व्हावी, या मागणीसाठी मधुकर कुडव यांनी उपोषण सुरू केले होते. या प्रकरणाची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ व पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे यांनी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्याशी चर्चा केली. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
यानंतर गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी ग्रामपंचायत इन्सुलीला लेखी पत्र देत भूमी अभिलेख विभागामार्फत संबंधित रस्त्याची शासकीय मोजणी करून हद्द निश्चित करण्यात येईल, तसेच मोजणीदरम्यान अतिक्रमण आढळल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ५३ अन्वये पुढील कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर मधुकर कुडव यांनी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन आपले उपोषण मागे घेतले.
यावेळी पंचायत समिती सदस्य सदाशिव राणे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, ग्रामविस्तार अधिकारी अंकुश जंगले, निगुडेचे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे, सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर, महेश सावंत, आरोंदा जिल्हा परिषद सदस्य सुमन कवठाणकर, माजगाव पंचायत समिती सदस्य जितू गावकर आदी उपस्थित होते.
