लोकांचे प्रश्न मांडायचे कोणाकडे ; सदस्यांचा सवाल :अधिकाऱ्यांच्या अनुपस्थीतीपुढे सभापतीसुद्धा हतबल..
कुडाळ : लोकांनी आम्हाला त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी या सभागृहात पाठवले आहे. पण या सभागृहात आमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी सक्षम अधिकारी किंवा खातेप्रमुख उपस्थित नसतात. पंचायत समितीच्या या सभा म्हणजे आबाधुबीचा खेळ झाला आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया सदस्य संतोष कांदळकर यांनी आज झालेल्या कुडाळ पंचायत समितीच्या मासिक सभेत व्यक्त केली. यावर आम्ही काय करावं, तुम्हीच सांगा, असे सांगून सभापती मिलिंद नाईक यांनी सुद्धा यावर आपली हतबलता व्यक्त केली. जर पुढच्या सभेपासून संबंधित सक्षम अधिकारी किंवा खातेप्रमुख हजर नसतील आम्ही सर्व सदस्य त्या त्या अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन प्रश्न मांडणार असल्याचे सभापती मिलिंद नाईक यांनी जाहीर केले. याबाबत आजच आमदार निलेश राणे याना पत्र देऊन त्यांचे लक्ष वेधणार असल्याचे श्री. नाईक यांनी सांगितले. दरम्यान गेल्या सर्वच सभांना अनुपस्थित असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. पिसाळ यांच्या कारभाराची चौकशी लावावी असा ठराव आजच्या सभेत घेण्यात आला.
कुडाळ पंचायत समितीची मासिक सभा सभापती मिलिंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी उपसभापती सीताराम तेली, गट विकास अधिकारी मनोज भोगटे, सहाय्यक गट विकास अधिकारी संजय ओरोसकर, प.स. सदस्य, खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पंचायत समितीच्या सभेला जिल्हा परिषद वगळता इतर खात्यांचे प्रमुख बऱ्याच वेळेला येत नाहीत. त्यामुळे सदस्यांनी उपस्थित केलेल्या लोकांच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत. मग आम्ही या सभांना का हजर राहायचे ? सक्षम अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणीतरी दुसराच कर्मचारी अपूर्ण माहिती घेऊन सभेला येतो, त्याच्याकडॆ माहिती नसते. मग जनतेचे प्रश्न सुटणार कसे ? पंचायत समितीच्या या सभा म्हणजे आबाधुबीचा खेळ चालला आहे. एकाने चेंडू दुसऱ्यावर मारायचा एवढेच फक्त या अधिकाऱ्यांचे धोरण आहे. असा संताप सदस्य संतोष कांदळकर यांनी व्यक्त केला. त्याला सदस्य योगेश धुरी यांनी सुद्धा अनुमोदन दिले. तुमची सत्ता आहे, मग अधिकारी तुमचे ऐकत का नाहीत ? असे त्यांनी सभापतींना या बाबत विचारले असता, अधिकारी येत नाहीत त्याला मी काय करू ? काय करायचे तुम्हीच सांगा, अशी हतबलता सभापती मिलिंद नाईक यांनी व्यक्त केली. शेवटी आयत्या वेळच्या विषयात बोलताना सभापती मिलिंद नाईक यांनी सांगितले कि जर एखादा अधिकरी सभेला अनुपस्थित असेल तर आपण सर्वानी त्या अधिकाऱ्याच्या दालनात जाऊन लोकांचे प्रश्न मांडायचे. आणि याबाबत आमदार निलेश राणे यांचे देखील लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
पाट रस्याबाबत सदस्य मंगेश प्रभू यांनी प्रश्न उपस्थित करून सोशल मीडियावरील एका गृप वर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. पिसाळ हे खोटी बिल करतात, पैसे घेतात असे आरोप त्यांच्यावर असल्याकडे लक्ष वेधले. हे जर खरे असेल तर श्री. पिसाळ यांच्या कामाची चौकशी करावी मागणी त्यांनी केली. त्यावर सभापतींनी त्यांच्या कामाची चौकशी करावी असा ठराव घेतल्याचे जाहीर केले. श्री. पिसाळ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या अनेक तक्ररी सदस्यांनी मांडल्या. दरम्यान माणगाव विभागात बालरोगतज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ द्यावा अशी मागणी सदस्य योगेश धुरी यांनी केली. त्यावर लवकरच कार्यवाही होईल असे उत्तर आरोग्य विभागाच्या अधिकऱ्यानी दिले.
गेली ३५ वर्ष तेंडोली भागात सुरु असलेली एसटीची वस्तीची फेरी रद्द करून ती फेरी पुन्हा कुडाळला आणली जाते. यात ४५ किलोमीटरचा फेरा पडतो. इंधन फुकट जाते. कारण त्या फेरीला रात्री प्रवासी मिळत नाहीत. एसटीचा तोटा होतो तरीदेखील गेले पंधरा दिवस ही फेरी चालवली जात आहे; याकडे सदस्य मंगेश प्रभू यांनी लक्ष वेधले. त्यावर कर्मचारी कमी असल्याने ऍडजेस्टमेन्ट म्हणून फक्त दोन दिवस हि फेरी पुन्हा कुडाळला आणण्यात आल्याचे एसटीच्या अधिकऱ्यानी सांगितले. कर्मचारी कमी असल्याने तडजोड करावी लागते असे ते अधिकारी म्हणाले. रात्री उशिरा मोठ्या शहरात जाणाऱ्या एसटीच्या गाड्या कुडाळ बसस्थानकात थांबत नाहीत याकडे सदस्य अमित पालव यांनी या सभेत पुन्हा लक्ष वेधले. त्यावर ती गाडी सापडली नाही. लांब पल्ल्याच्या १५० फेऱ्या कुडाळला थांबतात. त्यांच्या चालक-वाहकांना सूचना देतो असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
माणगाव खोऱ्यात कमीदाबाने वीज पुरवठा होत असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. तसेच कुठेही लाईट गेली कि प्रत्येक वेळी माणगावची लाईट काढली जाते, याकडे सदस्य योगेश धुरी यांनी लक्ष वेधले. कृषी पंपांच्या वीज बिलाबाबत सदस्य मंगेश प्रभू यांनी प्रश्न उपस्थित केला. हिर्लोक परिसरात पाच गावांसाठी दोनच वायरमन आहेत ते वाढवून द्यावेत अशी मागणी सदस्य अश्विनी सावंत यांनी केली. सदस्यांची नावे सांगून वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविले जातात याकडे अमित पालव यांनी लक्ष वेधले.
२ हजार ७४४ शेतकऱ्यांचे नुकसानभरपाई पंचनामे पूर्ण झाल्याचे तालुका कृषी अधिकऱ्यानी सांगितले. एल निनोचा प्रभाव यावेळी सर्वत्र आहे. आपल्याकडे पाऊस पुरेसा पडला तरी सप्टेंबर-ऑक्टोबर महिनाय्त एलनिनोचा प्रभाव जाणवेल असे तालुका कृषी अधिकारी म्हणाले.
कसाल येथील जिल्हा परिषद शाळेची कंपाउंड भिंत नादुरुस्त झाली आहे. ती कधीपण पडू शकते. मुले तिथे खेळायला जातात. दुर्घटना होऊ शकते. याकडे कुडाळ पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे गेल्या सभेत लक्ष वेधून सुद्धा कोणीच अधिकारी त्या ठिकाणी अजून गेलेला नाही, त्याबद्दल अमित पालव यांनी संताप व्यक्त केला. जर त्या भिंतीची दुरुस्ती झाली नाही तर शाळेत मुले पाठवणार नाही असा इशाराच त्यांनी दिला.
साळगाव माणगाव रस्ता कधी पूर्ण होणार, असा सवाल सदस्य योगेश धुरी यांनी उपस्थित केला. डांबराचा अभाव असल्याने काम रखडले असल्याचे संबंधित अधिकऱ्यानी उत्तर दिले. पण आठ दिवसात काम पूर्ण होईल असे त्या अधिकाऱ्यांनी सांगितले. साळगाव नाईक वाडी येथे गरज नसताना पक्की गटारे बांधली आहेत. आणि जिथे गटांरांची आवश्यकता आहे तिथे गटारेच केली नाहीत याकडे सदस्य योगेश धुरी यांनी लक्ष वेधले. श्रीमती घावनाळकर यांनी देखील आपल्या भागातील प्रश्न मांडले.
