केंद्राच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ आणि टंचाई; सुशांत नाईक यांचा सरकारवर हल्लाबोल..
⚡देवगड,ता.१९-:
पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे आणि निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून केंद्र सरकारच्या चुकीच्या आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केला. देवगड एसटी स्टँडसमोर झालेल्या आंदोलनावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका करत निषेध नोंदविला.
यावेळी बोलताना सुशांत नाईक म्हणाले, “पेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा तब्बल तीन रुपयांची वाढ झाली असून येत्या काही दिवसांत दर आणखी २० ते ३० रुपयांनी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महागाईचा मोठा भडका उडणार असून सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडून पडेल.”
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “कहा गये अच्छे दिन?”, “पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा”, “सर्वसामान्यांना दिलासा द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनाचे नेतृत्व युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले.
यावेळी तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर, महिला आघाडी प्रमुख हर्षा ठाकूर, काका जेठे, सीमा धुरी, पंकज दुखंडे, सुधीर जाधव, जगन्नाथ गुरव, लक्ष्मण कदम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाईक पुढे म्हणाले, “रशिया भारताला कच्चे तेल देण्यास तयार असतानाही अमेरिकेच्या दबावाखाली केंद्र सरकार योग्य निर्णय घेण्यात अपयशी ठरत आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध असूनही जाणीवपूर्वक इंधन टंचाई निर्माण केली जात आहे. मोदी सरकारचे आंतरराष्ट्रीय धोरण पूर्णपणे अपयशी ठरले आहे.”
रुपयाचे मूल्य सातत्याने घसरत असल्याने आगामी काळात सर्वच वस्तूंच्या किमती वाढतील, असा इशाराही त्यांनी दिला. “पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी इंधन पुरवठा सुरळीत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात सिंधुदुर्गातील नागरिकांना तासनतास पेट्रोल पंपांवर रांगेत उभे राहावे लागत आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दरवाढ मागे घ्यावी आणि इंधन पुरवठा सुरळीत करावा,” अशी मागणीही त्यांनी केली.
मोदी आणि फडणवीस सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी शहरातून निषेध व्यक्त केला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून शासनाने नागरिकांना तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
