पारंपारिक मच्छिमारांमध्ये संताप ; बाबी जोगी व अन्वय प्रभू यांनी घेतला समाचार..
⚡मालवण ता.१६-:
मालवणसह जिल्ह्याच्या समुद्रात बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या एलईडी लाईट मासेमारीच्या झगमगाटाची छायाचित्रे पारंपारिक मच्छिमारांनी प्रसारित करत आवाज उठवीला असताना याबाबत मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सदर छायाचित्रे जुनी असून मत्स्य विभागाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केल्याने याबाबत पारंपारिक मच्छिमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याबाबत पारंपारिक मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी सहायक मत्स्य आयुक्त श्री. कुवेसकर हेच वरिष्ठाना खुश करण्यासाठी अशी वक्तव्ये करून दिशाभूल करत आहेत, अशा चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी, असे म्हटले आहे. तर पारंपारिक मच्छिमार नेते अन्वय प्रभू यांनी सहायक मत्स्य आयुक्तांनी आमच्यासोबत किनाऱ्यावर यावे, समुद्रात सुरु असलेली एलईडी लाईट मासेमारी आम्ही त्यांना दाखवून देतो, असे आव्हान दिले आहे.
बेकायदेशीर व अतिरेकी अशा एलईडी लाईट मासेमारी विरोधात गेली काही वर्षे पारंपारिक मच्छिमार लढा देत असून मत्स्यदुष्काळजन्य परिस्थिती निर्माण करणारी आणि पारंपारिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आणणाऱ्या या मासेमारीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे. काही दिवसापूर्वी मालवणात पारंपारिक मच्छिमारांनी या मासेमारी विरोधात आपला लढा तीव्र करत सहाय्यक मत्स्य आयुक्त सागर कुवेसकर यांना जाब विचारला होता. त्यानंतर तीन चार एलईडी नौका पकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, तरीही जिल्ह्याच्या समुद्रात एलईडी लाईट मासेमारीचा धुमाकूळ सुरु असल्याचे स्थानिक मच्छिमारांनी म्हटले होते.
एलईडी लाईट मासेमारीच्या प्रकाशझोताचा समुद्रातील झगमगाट किनाऱ्यावरून दिसून येत असल्याने पारंपारिक मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी दोन दिवसापूर्वी या झगमगाटाचे फोटो प्रसारित करत याबाबत पुन्हा एकदा आवाज उठवला होता. मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांनी या मासेमारीविरोधात कारवाईच्या सूचना देऊनही त्यांना न जुमानता एलईडी लाईट मासेमारी सुरूच असल्याची टीका श्री. जोगी यांनी करत मत्स्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
त्यानंतर सहाय्यक मत्स्य आयुक्त सागर कुवेसकर यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक काढत एलईडी व पर्ससीन मासेमारीला आळा घालण्यासाठी अंमलबजावणी अधिकाऱ्यांची विशेष पथके तयार करून सातत्याने कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगत एलईडी मासेमारीचे जुने फोटो किंवा नाईट व्हिजनमध्ये काढण्यात आलेले फोटो प्रसारित करून मत्स्य विभागाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले आहे. सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या या तर्कावर पारंपारिक मच्छिमार नेते बाबी जोगी व अन्वय प्रभू यांनी जोरदार टीका केली आहे.
कुवेसकर यांची वक्तव्ये वरिष्ठाना खुश करण्यासाठी – बाबी जोगी
सागर कुवेसकर यांचे वक्तव्य हे फक्त वरिष्ठांना खुश करण्यासाठी असून अशा अधिकाऱ्यांमुळे संपूर्ण शासनाची आणि प्रामुख्याने मत्स्य विभागाची मच्छमंत्र्यांची प्रतिमा मलिन होत आहे, अशी टीका बाबी जोगी यांनी केली आहे. मत्स्य विभागाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात सध्या चालू हंगाम शेवटचे केवळ दहा दिवस उरले असल्याने अनेक मासेमारी नका आधीच बंद झाले आहेत तर मोठ्या प्रमाणात खलाशी वर्ग आपल्या मूळ गावी परतण्याच्या तयारीत आहे मात्र असे असले तरी कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर मासेमारीला अजिबात मुभा दिली जाणार नाही किंवा त्यांच्यासाठी कोणताही सॉफ्ट कॉर्नर दिला जाणार नाही, असे सहाय्यक मत्स्य आयुक्त सागर कुवेसकर हे म्हणत आहेत मग सिंधुदुर्ग – मालवणच्या समुद्रात एलईडी बोटी कशा काय चालू आहेत ? असा सवाल जोगी यांनी केला आहे. आपण एलईडी लाईट मासेमारीचा काढलेला फोटो हा १२ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजून ८ मिनिटांनी काढलेला आहे. त्यामुळे याबाबत मत्स्यमंत्र्यांनी चौकशी करून जे अधिकारी शासनाची दिशाभूल करत आहेत अशांवर कारवाई करावी आणि मत्स्य खात्याची सुधारणा करावी. एलईडी च्या बोटी कोणाकोणाच्या आहेत हे अधिकाऱ्यांना कदाचित माहीत असावे म्हणूनच अधिकारी अशी वक्तव्ये करत आहेत. समुद्रात शेकडोच्या संख्येने एलईडी नौका असताना केवळ मच्छीमारांनी आवाज उठवल्यावर एखादी कारवाई करून देखावा केला जातो. मत्स्यमंत्र्यांनी सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मच्छीमारांची आमसभा बोलावून मत्स्य खाते एलईडीवर किती कारवाई करत आहे हे जाणून घ्यावे, नाहीतर अशा चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, असे बाबी जोगी यांनी म्हटले आहे.
सहायक मत्स्य आयुक्तानी आमच्यासोबत किनाऱ्यावर यावे – अन्वय प्रभू
पारंपारिक मच्छिमारांनी प्रसारित केलेले फोटो हे सध्या समुद्रात सुरु असलेल्या बेकायदेशीर एलईडी लाईट मासेमारीचेच असून या मासेमारीचा झगमगाट किनाऱ्यावरूनही दिसत आहे. त्यामुळे सहाय्यक मत्स्य आयुक्त सागर कुवेसकर यांना रात्रीच्या वेळी एलईडी नौकांचा प्रकाश दिसत नसल्यास त्यांनी रात्रीच्या वेळी आमच्यासोबत किनाऱ्यावर यावे, आम्ही त्यांना एलईडी मासेमारीचा झगमगाट दाखवून देतो, असे आव्हान अन्वय प्रभू यांनी दिले आहे.
