⚡सावंतवाडी ता.१६-: राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आज येथील उपजिल्हा रुग्णालयात सावंतवाडी भारतीय जनता पक्षाच्यावतीने डेंग्यू आजाराविषयी जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाद्वारे रुग्ण, नातेवाईकांना डेंग्यूच्या प्रतिबंधाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी उपस्थितांना डेंग्यूबद्दल माहिती देत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, डेंग्यू हा रोग एडीस या डासापासून होतो. हा डास स्वच्छ पण साचलेल्या पाण्यात वाढतो. घरासमोरील ड्रम, टाक्या, कुंड्या, टायर, कूलर तसेच इतर ठिकाणी पाणी साचू देऊ नये, असे आवाहन करण्यात आले. विशेषतः पावसाळ्यात घर व परिसर स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच, पावसाळ्यात घरासमोरील गटारे उघडी अथवा तुंबलेली असल्यास तात्काळ नगरपालिकेला कळवून त्यांची स्वच्छता करून घ्यावी. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नगरपालिकेच्यावतीने डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येणार असल्याचीही माहितीही त्यांनी यावेळी दिली. डेंग्यूची लक्षणे, वेळीच उपचार घेण्याचे महत्त्व आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. अशा प्रकारच्या जनजागृती उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढून डेंग्यूसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालयात भाजपकडून जनजागृती…
