सोमवार 25 मे रोजी “कवळास” उत्सवाने होणार सांगता..
⚡वेंगुर्ला ता.१६-: महाराष्ट्र राज्यात
जागृत देवस्थान अशी ख्याती पावलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध तुळस गावातील श्री देव जैतीर उत्सव भक्तिमय वातावरणात व भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न झाला. शनिवारी 16 मे रोजी हा प्रसिद्ध उत्सव संपन्न झाला, तर सोमवार 25 मे रोजी “कवळास ” उत्सवाने सांगता होणार आहे. येथील सर्व ग्रामस्थ, देवस्थान कमिटी पदाधिकारी , स्वयंसेवक व वेंगुर्ला पोलिसांचे योग्य नियोजनात हा ‘ऐतिहासिक’ परंपरा लाभलेला उत्सव भाविकांच्या मोठ्या प्रचंड गर्दीत संपन्न झाला. तालुक्यातील तुळस गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री जैतीर उत्सवासाठी
सकाळपासून मुख्य देवघरात ओटी भरण्यासाठी माहेरवाशीनीची मोठी गर्दी केली होती. तसेच मुख्य श्री देव जैतीर मंदिरात केळी, नारळ ठेवणे, नवस फेडण्यासाठी संपूर्ण दिवसभर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी दुपारी देव तरंगदेवतासह मुख्य मांडावर आल्यावर भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांनी तसेच विविध लोकप्रतिनिधिनी श्री जैतीर देवतेचे दर्शन व आशीर्वाद घेतले.
