मळगावचे सुपुत्र ज्ञानेश्वर राणेंचे शिवकार्याचे व्रत…

इतिहासाची साधने व प्रदर्शन’ उपक्रमाचे शतक पूर्ण..

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावचे सुपुत्र, इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी शिवकार्याचा ध्यास घेत इतिहासाची साधने व प्रदर्शन हा उपक्रम यशस्वीपणे राबवित इतिहास शिक्षणाला नवे परिमाण दिले आहेत. आतापर्यंत या उपक्रमाचे तब्बल १०० पेक्षा अधिक कार्यक्रम झाले आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना जीवंत इतिहासाचा अनुभव देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे.
जवळजवळ ७५ पेक्षा अधिक शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला असून १४ मे रोजी श्री शंभू जन्मोत्सवानिमित्त गोवा राज्यातील पेडणे तालुका येथील श्री देवी भगवती मंदिर, पार्से येथे या उपक्रमाचा १०० वा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक तसेच इतिहासप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
वेंगुर्ले तालुक्यातील कै. रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं. १ येथून सुरू झालेला हा उपक्रम आज जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इतिहास समजून घेण्याचे प्रभावी माध्यम ठरत आहे. हा उपक्रम दुर्ग मावळा प्रतिष्ठान, दुर्ग रक्षक प्रतिष्ठान, रेडी तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था भारत अंतर्गत राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू संवर्धन विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे. नाममात्र शुल्कात जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहास केवळ पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष शस्त्रे, ऐतिहासिक वस्तू आणि लिखित साधनांमधून समजतो. इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांच्या अभ्यासपूर्ण व अभ्यासक दृष्टिकोनातून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनामुळे इतिहास शिकणे विद्यार्थ्यांसाठी रंजक, अनुभवात्मक आणि प्रेरणादायी ठरत आहे. या प्रदर्शनात मराठा धोप, राजपूत धोप, खंडा तलवार, नागीन तलवार, मराठा गुर्ज, जिरेटोप, ढाल, वाघनखे, कट्यार, जंबिया, दांडपट्टा, बाण, उर्मी यांसारखी दुर्मिळ ऐतिहासिक शस्त्रे विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात येतात. प्रत्येक शस्त्राचा उपयोग, रचना व ऐतिहासिक पार्श्वभूमी सविस्तरपणे समजावून सांगितली जाते. अनेक विद्यार्थ्यांसाठी ही शस्त्रे प्रत्यक्ष पाहण्याचा हा पहिलाच अनुभव असल्याने विशेष कुतूहल निर्माण होते.
यासोबतच शिवचरित्र, शिवभारत, छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती, शिवभूषण, शिवकालीन शस्त्रास्त्रे यांसारखे १५० हून अधिक ऐतिहासिक ग्रंथ, मोडी पत्रे, ताम्रपट, दानपत्रे, शिवराय व शंभूराजांचे हस्ताक्षर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखविले जाते. लिखित साधनांचे ऐतिहासिक संशोधनातील महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येते.
भौतिक साधनांमध्ये ऐतिहासिक चलने, ब्रिटिशकालीन पोस्ट पत्रे, शाहीचा हौद व बोरू, कवड्याची माळ, जुनी टाळी, स्क्रोल होल्डर, सावरकरांनी साकारलेला भारताचा ध्वज, तोफेची प्रतिकृती, लोखंडी तोफगोळा यांचेही आकर्षक प्रदर्शन केले जाते. तसेच विरगळ, सतीशिळा, शिलालेख, मराठा आरमारातील जहाजांच्या प्रतिकृती, गड–कोटांचे प्रकार, बाजीप्रभू देशपांडे यांची वंशावळ व आंग्रेंचे मानचिन्ह यांची छायाचित्रे विद्यार्थ्यांना दाखवली जातात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना इतिहासाची प्राथमिक ओळख करून देत इयत्ता पाचवी ते आठवीच्या अभ्यासक्रमानुसार भौतिक, मौखिक व लिखित साधने समजावून सांगितली जातात. शिवभारत मधील काही प्रसंगांचे प्रात्यक्षिक सादरीकरण करून इतिहास जीवंत स्वरूपात अनुभवण्याची संधी दिली जाते. सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेत विद्यार्थ्यांना काही शस्त्रे हाताळण्याचा अनुभवही दिला जातो. या उपक्रमातून विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्येही इतिहासाविषयी जागृती निर्माण होत आहे. जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व, शिवविचार, संस्कारमूल्ये, स्त्री आत्मसंरक्षण आणि राष्ट्रप्रेम यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दुर्मिळ ऐतिहासिक साधनांचा प्रत्यक्ष अनुभव देणारा हा उपक्रम सध्या मोठ्या प्रमाणावर कौतुकास पात्र ठरत असून, आगामी काळात आणखी शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page