सिंधुदुर्ग जिल्हा परिषद इतिहासात प्रथमच ३० कोटींपार…

३४.३४ कोटींच्या सुधारित अर्थसंकल्पास मंजुरी..

⚡ओरोस ता १५-: जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला बळकटी देणारी घटना शुक्रवारी घडली. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच ३० कोटींच्या पुढे जिल्हा परिषदेचे बजेट गेले आहे. दुपारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत तब्बल १९ कोटी ५२ लाख १९ हजार ३४५ रुपयांच्या सुधारित वाढ असलेल्या अंदाजपत्रकासह ३४ कोटी ३४ लाख १९ हजार ३४५ रुपयांचे २०२६-२७ चे सुधारित अंदाजपत्रक वित्त सभापती संतोष साटविलकर यांनी सभागृहात मांडले. त्याला सभागृहाने एकमुखी मंजुरी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची विशेष सभा शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपाध्यक्ष तुकाराम साईल, विषय समिती सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर, रोहिता तांबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक उदय पाटील तसेच सभा सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्यासह सदस्य अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सभेच्या सुरुवातीला दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी, सिंधुरत्न योजनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पालकमंत्री नितेश राणे, राज्यसभा खासदार विनोद तावडे, विधान परिषद आ प्रमोद जठार, राज्य पणन महामंडळावर निवड झाल्याने कृषी उत्पन्न समितीचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे यांचे अभिनंदन ठराव घेण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे वित्त सभापती संतोष साटविलकर यांनी मूळ अंदाजपत्रकाच्या दुप्पतीपेक्षा जास्त वाढ असणारे जिल्हा परिषदेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे बजेट सभागृहात सादर केले. ३४ कोटी ३४ लाख १९ हजार ३४५ रुपये खर्चाचे हे अंदाजपत्रक आहे. या वर्षीचे मूळ अंदाजपत्रक १४ कोटी ७२ लाख ८ हजार ६०० रुपये खर्चाचे होते. मात्र, आज सादर केलेल्या सुधारित अर्थसंकल्पात घसघशीत वाढ दिसून आली. जिल्ह्यातील नगर परिषदांपेक्षा कमी बजेट जिल्हा परिषदेचे होते. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सर्वजण करीत होते. परंतु आज जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच ३० कोटींच्या पुढे अंदाजपत्रक पोहोचले आहे. ही वाढ जिल्ह्याच्या ग्रामीण विकासासाठी विश्वास देणारी असल्याने सभागृहाने वित्त सभापती संतोष साटविलकर यांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page