कणकवली : तळेरे बस स्थानकात एस.टी. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या सॅकमधील पर्स चोरी केल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात बायजाबाई सुभाष देढे (वय ४०, रा. कागवाड, ता. अथणी, जि. बेळगाव) हिच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तिलोतमा शरद मणचेकर (वय ३८, रा. मणचे बौद्धवाडी, ता. देवगड) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिलोतमा मणचेकर या जानेवारी २०२६ पासून सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, ओरोस येथील ए.आर.टी. सेंटरमध्ये सीएससी को-ऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी दुपारी त्या व त्यांची नणंद सुविधा सुधाकर पवार या तळेरे येथे बाजारासाठी आल्या होत्या. बाजार करून दोघी तळेरे बस स्थानकात आल्या. त्यावेळी तिलोतमा मणचेकर यांच्या पाठीवर सॅक होती व हातात बाजाराच्या पिशव्या होत्या. सॅकमध्ये ठेवलेल्या लहान पर्समध्ये ५ हजार २०० रुपये रोख रक्कम व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एटीएम कार्ड ठेवले होते.
सायंकाळी सुमारे ४.१५ वाजता वैभववाडी ते विजयदुर्ग जाणारी एस.टी. बस तळेरे येथे आली. बसमध्ये चढण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने त्या बसमध्ये चढल्या. बसमध्ये चढल्यानंतर त्यांनी सॅक वरच्या कप्प्यात ठेवली व तिकीटासाठी पैसे काढण्याकरिता सॅक उघडली असता सॅकची चैन उघडी असल्याचे निदर्शनास आले. तपासणी केली असता पर्स गायब असल्याचे लक्षात आले.
यावेळी बसमधील एका महिला प्रवाशाने त्यांच्या पाठीमागे मेहंदी रंगाची व त्यावर पांढऱ्या फुलांची साडी परिधान केलेली महिला सॅकची चैन उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिलोतमा मणचेकर व त्यांची नणंद या दोघींनी बसमधून खाली उतरून परिसरात शोध घेतला. काही वेळाने संशयित महिला तळेरे बस स्थानक परिसरात दिसून आली. तिला थांबवून तिच्याकडील बॅग तपासली असता त्यामध्ये तिलोतमा मणचेकर यांची लाल रंगाची पर्स आढळून आली.
घटनेची माहिती डायल ११२ वर देण्यात आल्यानंतर महिला पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी चौकशी केली असता संबंधित महिलेने आपले नाव बायजाबाई सुभाष देढे (रा. कागवाड, ता. अथणी, जि. बेळगाव) असे सांगितले तसेच तिच्यासोबत आणखी तीन महिला असल्याची माहिती दिली.
चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये लाल रंगाची पर्स, ५ हजार २०० रुपये रोख रक्कम आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एटीएम कार्ड असा एकूण ५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल होता.
याप्रकरणी कणकवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
