प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचे आदेश..
⚡कणकवली ता.१३-:
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने अत्यावश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी ही फक्त तालुकास्तरावर किंवा महसूल यंत्रणेची नसून सर्वप्रथम गाव पातळीवर आवश्यक उपाययोजना केल्या जाव्यात, असे प्रतिपादन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले. येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित नैसर्गिक आपत्ती आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी प्रांताधिकारी श्री. कातकर म्हणाले की, ग्रामपंचायतींनी आपल्या स्तरावर टॉर्च, कटर, लाईफ जॅकेट आणि दोरखंड यांसारखे अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून ठेवावे. आपत्कालीन स्थितीत केवळ वरिष्ठ कार्यालयांकडे धाव न घेता स्थानिक पातळीवर तातडीने कार्यवाही सुरू करणे आवश्यक आहे. या बैठकीला तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. कातकर यांनी काही विभाग प्रमुखांच्या अनुपस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांच्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावरील खड्डे भरणे, रम्बलर बसवणे आणि धोकादायक झाडांच्या फांद्या व बॅनर हटवण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. नडगिवे येथे रम्बलर बसवण्याचे काम सुरू असून कणकवलीतही ते लवकरच पूर्ण होईल, असे आश्वासन महामार्ग प्राधिकरणाने दिले आहे. तसेच कासार्डे ओव्हर ब्रिजच्या कोसळलेल्या प्लास्टरबाबतही आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शिक्षण विभागाचा आढावा घेताना प्रांताधिकारी म्हणाले की, पावसाळ्यात पुराचा धोका उद्भवल्यास शाळांच्या बाबतीत स्थानिक परिस्थिती पाहून तातडीने निर्णय घेतले जावेत. मुलांची सुरक्षितता महत्त्वाची असून त्यांना घरी सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची वाट पाहण्याची गरज नाही. तसेच ज्या शाळांची दुरुस्ती किंवा निर्लेखन आवश्यक आहे, ती कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ग्रामपंचायत विभागाने पावसाळ्यात शुद्ध पाणीपुरवठा सुनिश्चित करावा आणि महावितरणने वादळी वाऱ्यामुळे खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ सज्ज ठेवावे.
बैठकीत आरोग्य विभाग, कृषी विभाग आणि नगरपंचायतीच्या कामांचाही आढावा घेण्यात आला.
उपजिल्हा रुग्णालयात पुरेसा औषधसाठा उपलब्ध असणे आणि शहरातील गटार सफाईची कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे श्री. कातकर यांनी सांगितले. पोलीस विभागाने पुराच्या वेळी धोकादायक पुलांवर बॅरिकेट्स लावून खबरदारी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कोणावरही कारवाईची वेळ येऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे पूर्ण करून सतर्क राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले.
