सबनीसवाडा, वैश्यवाडा व चितारआळी परिसरात सुरळीत पाणीपुरवठ्याच्या सूचना..
⚡सावंतवाडी ता.१३- : सबनीसवाडा, वैश्यवाडा व चितारआळी परिसरातील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक आनंद नेवगी व नगरसेविका मोहिनी मडगांवकर यांनी पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर यांच्याशी चर्चा करत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी पोईपकर व लाखे यांना बोलावून कमी प्रमाणात होणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक ३ मधील नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होणे आवश्यक असून याबाबत तातडीने योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
या बैठकीवेळी सबनीसवाडा येथील काका पटेल यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
