संबंधित विभागाचे अधिकारी कामावर उपस्थित ठेवण्याची नागरिकांची मागणी..
⚡वेंगुर्ला ता.१३-: नुकताच चार दिवसापूर्वी वेंगुर्ला तालुक्यासह मठ एरियात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान 15 दिवसापूर्वी वेंगुर्ला पंचायत समिती सभापती शंकर घारे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने साईडपट्टी माती भरावाचे काम त्वरित हाती घेतले होते. दरम्यान मठ एरियातील संबंधित काम मंगळवारपासून सलग 2 दिवस बंद असल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान भरावासाठी माती उपलब्ध झाली नसल्याचे अधिकारी वर्ग सांगताहेत, तर मजूर उपलब्ध नसल्याचे कारण ठेकेदार प्रतिनिधी देत आहे. वाहतूक – दळणवळण या दृष्टीने जिल्ह्यातील महत्वाचा मार्ग असूनही शासनाचे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान झालेले काम व उर्वरित काम पावसाळा तोंडावर असल्याने माती भराव व रोलिंग योग्य पद्धतीने व्हावे, अशी मागणी आहे. पावसाचे आगमन कोणत्याही क्षणी होणार असल्याने रस्त्यावर माती वाहून येऊन अपघात होण्याची शक्यता आहे. वेंगुर्लावरून कुडाळ तसेच सावंतवाडी कडे जाणारा महत्वाचा मार्ग असल्याने काम वेळेत पूर्ण न झाल्यास याचा फटका वाहनधारक, नोकरदार वर्ग, स्थानिकांना बसणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने हे काम मार्गी लावावे, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात आली आहे. मुख्यत : महत्वाचा मार्ग असल्याने केवळ सुपरवायझर नको, तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी पूर्णवेळ उपस्थित राहणे आवश्यक आहे. कारण ” सुमार ” दर्जाचे भरावाचे काम झाल्यास पावसाळ्यात याचा फटका ” सर्वसामान्य ” जनतेला बसणार आहे. या गंभीर बाबीकडे वेंगुर्ला पंचायत समितीचे कार्यतत्पर सभापती शंकर घारे यांनी पुनःश्च लक्ष पुरवावे, अशी मागणी नागरिकांतून करण्यात आली आहे.
