सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही..
⚡सावंतवाडी ता.१३-: तालुक्यातील मळगाव घाट येथे आज सकाळच्या सुमारास एका इको कारचा भीषण अपघात झाला. एमएच ०७ क्यू ७९०४) क्रमांकाची ही कार सावंतवाडीच्या दिशेने जात असताना घाटातील वळणावर नियंत्रण सुटून कडेला घसरत दरीत कोसळून अपघातग्रस्त झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे, याच ठिकाणी यापूर्वीही अशाच प्रकारे इको कार कोसळून अपघात झाला होता. त्यानंतर पुन्हा आज त्याच ठिकाणी अपघात घडल्याने मळगाव घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घाटातील तीव्र वळणे, अपुरी संरक्षक भिंत, तसेच स्पष्ट सूचना फलकांचा अभाव यामुळे वाहनचालकांना धोका निर्माण होत असल्याची चर्चा स्थानिकांकडून होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. वाहनातील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. संरक्षक कठडे (गार्डरेल), वेगमर्यादा दर्शविणारे फलक, रस्त्यावर रिफ्लेक्टर, तसेच धोक्याची पूर्वसूचना देणारी चिन्हे तात्काळ बसवावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. संबंधित यंत्रणांनी वेळीच दखल न घेतल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची भीतीही स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
