महावितरणच्या कारभारावर साळगावकरांचा संताप: त्वरित दखल घ्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील..
⚡सावंतवाडी ता.११-: शहरातील पाटील कॉम्प्लेक्स डीपी परिसरात आज अचानक विजेचा दाब वाढल्याने अनेक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेमुळे महावितरणच्या गलथान कारभाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.
सोमवारी दुरुस्तीच्या नावाखाली शहरात दिवसभर वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येत असल्याने नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत. त्यातच रात्री-अपरात्री वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एका बाजूला उकाडा तर दुसऱ्या बाजूला डासांचा त्रास अशा दुहेरी संकटात नागरिक सापडले आहेत.
महावितरणकडून कॉन्ट्रॅक्ट बेसवरील कामगारांमार्फत काम करून घेतले जात असून त्यांच्या कामावर कोणतेही प्रभावी सुपरव्हिजन नसल्याचा आरोपही साळगावकर यांनी केला. त्यामुळे तांत्रिक बिघाड आणि नागरिकांचे नुकसान वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
महावितरणने आपला गलथान कारभार तातडीने सुधारावा व नागरिकांच्या समस्यांची वेळीच दखल घ्यावी, अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला.
