सबनीसवाडा राजवाडा परिसरातील धोकादायक फांद्या हटविण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष…

निशांत तोरसकर:निवेदन देऊनही कारवाई नाही, नगरसेविका मोहिनी मडगावकर यांची प्रशासनावर अंकुश नसल्याची केली टीका..

⚡सावंतवाडी ता.११-: सबनीसवाडा राजवाडा परिसरातील रस्त्यावर अर्धवट तुटलेल्या अवस्थेत झाडाच्या धोकादायक फांद्या गेले पंधरा दिवस लोंबत असूनही सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शिवसेना उबाठा शहर संघटक निशांत तोरसकर यांनी केला आहे. या प्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका सौ. मोहिनी मडगावकर तसेच भाजपचे युवा कार्यकर्ते ॲड. चैतन्य सावंत यांनी रीतसर निवेदन देऊनही प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नसल्याने सत्ताधारी नगरसेवकांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचे दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली.

मागील वर्षी याच ठिकाणी झाड अंगावर पडून एका युवा भजनी बुवाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशी घटना घडूनही प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या धोकादायक झाडापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर नगराध्यक्षांचे निवासस्थान असूनदेखील या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे तोरसकर यांनी म्हटले आहे.
या ठिकाणची पाहणी करून निशांत तोरसकर यांनी प्रशासनाला दोन दिवसांची मुदत दिली असून, त्या कालावधीत फांद्या हटविण्यात आल्या नाहीत तर त्या स्वतः तोडून नगरपालिकेच्या दारात आणून टाकण्यात येतील, असा इशारा दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितेश म्हाडगुत व आरपीआय पदाधिकारी प्रदीप कांबळे उपस्थित होते.

You cannot copy content of this page