मिलिंद सावंत:अवकाळी पावसाने बागायतदार संकटात; तत्काळ पंचनामा करून मदत द्या..
⚡बांदा ता.०९-:
सावंतवाडी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी तसेच शासनाने विशेष मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केली आहे.
सावंतवाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे बागायतदार व शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आंबा व काजू हंगाम अंतिम टप्प्यात असताना अचानक झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. अनेक ठिकाणी आंब्याची फळे झाडावरून खाली पडली असून काजू बियांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या असून बागायतींची हानी वाढली आहे. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या गवताचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. आधीच वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटाचा मोठा फटका बसला आहे.
मनसेचे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळणे आवश्यक असून शासनाने विशेष पॅकेज जाहीर करून बागायतदारांना दिलासा द्यावा, असे त्यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतेत असून आता प्रशासन व शासनाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
फोटो——-
मिलिंद सावंत
