अवैध दारू वाहतुकीवर इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाची मोठी कारवाई…

१ कोटी २३ लाख ६८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त: मध्यप्रदेशातील एक जण ताब्यात..

⚡बांदा ता.०८- : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली तपासणी नाक्यावर मोठी कारवाई करण्यात आली असून गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर अवैधरित्या गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला. या कारवाईत तब्बल ₹१ कोटी २३ लाख ६८ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इन्सुली तपासणी नाका पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार खालसा पंजाबी ढाब्यासमोर सापळा रचण्यात आला होता. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टाटा कंपनीच्या मालवाहू वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहन क्रमांक CG-04-PQ-0335 मधील मोठ्या लाकडी पेट्यांमध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या लपवून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.
या कारवाईत १८० मि.ली. क्षमतेच्या बाटल्यांचे एकूण १०८० बॉक्स (५१,८४० बाटल्या) जप्त करण्यात आल्या. जप्त मद्याची किंमत अंदाजे ₹१ कोटी ३ लाख ६८ हजार असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टाटा कंपनीचा ट्रक अंदाजे ₹२० लाख किमतीचा आहे.
या प्रकरणी वाहन चालक पंकज गोविंद व्यास (वय ३३, रा. डोंगराखेडा, जि. देवास, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेण्यात आले असून महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त पी.पी. सुबे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर व अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत दुय्यम निरीक्षक धनंजय सावंत, विवेक कदम, निलेश माळी तसेच जवान रणजित शिंदे, दीपक वायदंडे, सतीश चांगुळे व अभिषेक खबी यांनी सहभाग घेतला.

गोवा बनावटीच्या अवैध मद्याची मोठी वाहतूक उधळली ; ₹१.२३ कोटींचा मुद्देमाल जप्त

You cannot copy content of this page