आई आणि मुलगी एकाच वेळी बारावी उत्तीर्ण…

४८ व्या वर्षी अंगणवाडी सेविकेची गगनभरारी..

⚡कणकवली ता.०२-:
‘शिकण्याला वयाचे कोणतेही बंधन नसते’ हे कळसुली येथील सौ. वैभवी हेमंत वारंग यांनी सिद्ध करून दाखवले आहे. आई आणि मुलगी एकाच वेळी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या असून, या माय-लेकींनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

सौ. वैभवी वारंग या कुडाळ तालुक्यातील पोखरण येथे अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी १९९२ मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर संसाराच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. मात्र, शिक्षणाची जिद्द कायम असल्याने तब्बल ३३ वर्षांनंतर त्यांनी कळसुली ज्युनिअर कॉलेजमधून बारावीची परीक्षा दिली. वयाच्या ४८ व्या वर्षी त्यांनी कला शाखेतून पहिल्याच प्रयत्नात ४१.६७ टक्के (२५० गुण) मिळवून यश संपादन केले.

दुसरीकडे, त्यांची मुलगी कु. रिद्धी हेमंत वारंग हिने देखील न्यू इंग्लिश स्कूल कसाल येथून विज्ञान शाखेतून परीक्षा दिली होती. ती ४७.१७ टक्के (२८३ गुण) मिळवून उत्तीर्ण झाली आहे.

नोकरी आणि संसाराचा गाढा ओढत असतानाच वैभवी ताईंनी मिळवलेले हे यश आणि आई-मुलीची ही जोडी एकाच वेळी उत्तीर्ण झाल्यामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

You cannot copy content of this page