नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रशासनाला झापले:आयसीयू आठवडाभरात सुरू होणार..
कणकवली :
कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे आणि सोयीसुविधांच्या अभावामुळे रुग्णांची होणारी ससेहोलपट थांबवा. हे रुग्णालय केवळ ‘रेफर सेंटर’ असता कामा नये, येथे रुग्णांना योग्य सेवा मिळालीच पाहिजे, अशा शब्दांत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी रुग्णालय प्रशासनाला बजावले. गुरुवारी सायंकाळी पारकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जिल्हा शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. सुबोध इंगळे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील उपस्थित होते.
डॉ. विशाल रेड्डी यांची पुन्हा नियुक्ती करा
रुग्णालयातील डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागतो. यावर बोलताना पारकर यांनी डॉ. विशाल रेड्डी यांची पुन्हा कणकवलीत बदली करून त्यांना येथे कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी केली. तसेच कायमस्वरूपी स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ यांची पदे तातडीने भरण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावर बोलताना डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितले की, राज्यात डॉक्टरांची १४४० पदे भरली जाणार असून, त्यात ग्रामीण भागाला प्राधान्य दिले जाईल.
बंद आयसीयू आठ दिवसांत सुरू होणार
रुग्णालयातील सुसज्ज आय.सी.यू. कक्ष केवळ निधीअभावी बंद असल्याचे समोर आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी हा कक्ष तातडीने सुरू करण्याची मागणी पारकर यांनी केली. यावर, येत्या आठवडाभरात आय.सी.यू. सुरू होईल, अशी ग्वाही डॉ. पंकज पाटील यांनी दिली.
१०८ रुग्णवाहिकेचा प्रश्न गंभीर
कणकवलीच्या १०८ रुग्णवाहिकेवर गेल्या चार महिन्यांपासून बी.एम.एस. डॉक्टर उपलब्ध नसल्याने गंभीर रुग्णांची गैरसोय होत आहे. इतर तालुक्याच्या रुग्णवाहिकेसाठी तासनतास वाट पहावी लागते, याकडे पारकर यांनी लक्ष वेधले. यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
स्वच्छता आणि पायाभूत सुविधांवर ताशेरे
रुग्णालय परिसरातील अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेजची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम होणे गरजेचे असून, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराबाबत आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे पारकर म्हणाले. तसेच रुग्णालयातील स्वच्छतागृहांची दुर्गंधी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था (वॉटर कुलर) यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
सुरक्षेसाठी सीसीटीव्हीची मागणी
रुग्णालयात डॉक्टरांवर होणारे हल्ले पाहता, सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील, अशी ग्वाही जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली.
