कासर्डे येथील आनंद नगरमध्ये मटका जुगारावर पोलिसांचा छापा…

⚡कणकवली ता.२७-:
कणकवली तालुक्यातील कासर्डे येथील आनंद नगर परिसरात बेकायदेशीररीत्या मटका जुगार खेळवणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी रोख रकमेसह ८,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद नगर (कासर्डे) येथे संशयित आरोपी अजित रामचंद्र नकाशे (वय ४९, रा. कासर्डे) हा लोकांकडून पैसे स्वीकारून ‘मुंबई मटका’ जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कणकवली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी या ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईत आरोपीकडून १,७२० रुपये रोख, ७ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ८,७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार झोरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

You cannot copy content of this page