गटार-नाले सफाई, आरोग्य व्यवस्था, वीज व झाडांची छाटणी यावर भर; १५ मेपूर्वी रस्ते पूर्ण करण्याचे आदेश, नगराध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक संपन्न…
⚡सावंतवाडी, ता. २७-: पावसाळा तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपरिषदेने आज ‘प्रि-मान्सून’ आढावा बैठक घेत शहरातील संभाव्य समस्यांवर सखोल चर्चा केली. नगराध्यक्षा आणि सत्ताधारी नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत विविध विभागांना कडक सूचना देत तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत सर्व नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील गटार व नाले सफाई तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत यासाठी नगरपालिका दवाखाना पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून आवश्यक औषधसाठ्याची आगाऊ मागणी करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले.
वीजपुरवठा खंडित होऊ नये किंवा शॉर्टसर्किटच्या घटना टाळण्यासाठी शहरातील विद्युत पोलची तपासणी करून ते सुस्थितीत ठेवण्याचे आदेश विद्युत विभागाला देण्यात आले. तसेच नागरिकांच्या घरांवर झुकलेल्या व जीर्ण झालेल्या झाडांच्या फांद्या तातडीने छाटण्याचे निर्देश देत यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचे ठरविण्यात आले.
दरम्यान, शहरात सुरू असलेल्या MNGL व वॉटर पाईपलाईनच्या कामांमुळे विस्कळीत झालेल्या रस्ते व गटारांबाबत नगरपरिषद कठोर झाली असून संबंधित कंत्राटदारांना गटारे दुरुस्त करण्यासाठी केवळ ८ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तसेच सर्व रस्ते १५ मेपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
अतिवृष्टी व वादळाचा धोका लक्षात घेऊन नगरपरिषदेने ‘आपत्ती व्यवस्थापन कक्ष’ स्थापन केला असून हवामान खात्याच्या सूचनांनुसार तात्काळ उपाययोजना करण्यासाठी सक्षम नियंत्रण केंद्र व कृती आराखडा तयार ठेवण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन दलाची यंत्रणाही सज्ज असल्याचा आढावा घेण्यात आला.
शहरातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियमित कामकाजासोबत आपत्कालीन जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडाव्यात, जेणेकरून नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, असे आवाहन यावेळी करण्यात आले. एकूणच, सावंतवाडी शहर पावसाळ्यासाठी सज्ज होत असून प्रशासनाने कामाचा वेग वाढवण्याचा निर्धार केला आहे.
