चौथीचे 202 व सातवीचे 86 विद्यार्थी सहभागी: गुणवंतांचा सन्मान;विक्रांत सावंत यांच्या संकल्पनेतून स्तुत्य उपक्रम..
⚡सावंतवाडी ता.२५-: शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष तथा जि.प. सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी, दोडामार्ग आणि माजगाव या तीन केंद्रांसाठी आयोजित करण्यात आलेली शिष्यवृत्ती सराव परीक्षा उत्साहात पार पडली. या उपक्रमाला तिन्ही केंद्रांतून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या परीक्षेत इयत्ता चौथीचे एकूण 202 तर इयत्ता सातवीचे 86 विद्यार्थी सहभागी झाले. दोडामार्ग इंग्लिश स्कूल येथे चौथीचे 50 व सातवीचे 26 विद्यार्थी सहभागी झाले होते. या केंद्रावर परीक्षा प्रमुख म्हणून बामणीकर सर यांनी शिक्षकांच्या सहकार्याने परीक्षा सुरळीत पार पाडली.
माजगाव केंद्र शाळेत चौथीचे 41 व सातवीचे 16 विद्यार्थी सहभागी झाले. या केंद्रावर केंद्रमुख्याध्यापक बांदेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा पार पडली. सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे चौथीचे 111 व सातवीचे 44 विद्यार्थी सहभागी झाले होते. येथे शृंगारे सर यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली.
यावेळी विक्रांत सावंत यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व अंतिम परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
परीक्षा आयोजनासाठी केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, मुख्याध्यापक एस. एन. पाटील, मुख्याध्यापिका एस. एस. कशाळीकर, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक व पर्यवेक्षक एन. जी. मुठे यांनी परीक्षा नियंत्रक म्हणून काम पाहिले.
दरम्यान, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत व सर्व सदस्यांनी सहभागी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन करून अंतिम परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
