पारंपारिक मच्छिमार सन्मेष परब यांनी केली ग्रीन सी कासवाची जाळ्यातून सुटका…

⚡मालवण ता.२२-:
मालवण राजकोटसमोरील समुद्रात पारंपारिक मच्छिमार सन्मेष परब हे मासेमारीला गेले असता त्यांच्या जाळ्यात अनावधानाने अडकलेल्या ग्रीन सी या समुद्री कासवाची परब यांनी सुटका करत त्याला जीवदान दिले.

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोरील समुद्रात सन्मेष परब हे मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यात एक समुद्री कासव हे अडकलेल्या अवस्थेत आहे असे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर सन्मेष परब यांनी कासवाची जाळ्यामधून सुटका करत त्याला समुद्रात सोडले.
यावेळी त्यांच्या सोबत महादेव केळुसकर आणि सुयोग परब हे पारंपरिक मच्छिमार उपस्थित होते.

सदर समुद्री कासव हे ग्रीन सी टर्टल या नावाने ओळखले जाते. ‘ग्रीन सी टर्टल’ हे जगभरातील उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय सागरी क्षेत्रात २० अंश सेल्सियस तापमान असणाऱ्या पाण्यात आढळून येते. ‘ग्रीन सी टर्टल’ हे सर्वात मोठे कठीण कवचाचे समुद्री कासव आहे. समुद्री कासवांमध्ये ते वैशिष्ट्यपूर्ण आहेत कारण ते प्रामुख्याने शाकाहारी असून, बहुतेक समुद्री गवत आणि शेवाळ खातात. ‘ग्रीन सी टर्टल’ हे नाव त्यांच्या चरबीच्या रंगावरून आले आहे (कवचावरून नाही), ज्याचे श्रेय मूळतः त्यांच्या आहाराला दिले जात होते; तथापि, इतर समुद्री कासवांमध्येही हिरवट रंगाची चरबी आढळते. यांचे कवच लंबगोलाकार आणि शेपटीकडे टोक असलेले असते. या कासवांची चोच तीक्ष्ण आणि बारीक दाते असलेली असते. भारतातील कठीण कवचधारी सागरी कासवांमधील आकाराने सर्वात मोठे असणारे हे कासव आहे. त्यांची लांबी सुमारे ३ ते ४ फूट पर्यंत वाढू शकते. पूर्ण वाढ झालेल्या प्रौढ ‘ग्रीन सी’ कासवांचे वजन १३६ ते १६० किलो दरम्यान असते, अशी माहिती समुद्री प्राणीमित्र अक्षय रेवंडकर यांनी दिली.

You cannot copy content of this page