⚡बांदा ता.२२-: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच पवित्र बुद्ध पौर्णिमेच्या औचित्याने बांदा येथील आंबेडकर नगर समाज मंदिर येथे शनिवार दिनांक २ मे रोजी सायंकाळी ८ वाजता भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समाज बांधवांसाठी आणि नागरिकांसाठी हा कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार असून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणून रियाज बँड लाईव्ह ऑर्केस्ट्रा मालवण यांचा सुरेल संगीताचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. मराठी, हिंदी तसेच भीम गीतांच्या सादरीकरणातून उपस्थितांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.
तसेच शुक्रवार दिनांक १ मे रोजी वक्तृत्व स्पर्धा (ऑनलाईन) आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारमंथन व वक्तृत्वकलेला चालना देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पहिले ते चौथी व पाचवी ते दहावी अशा दोन गटात घेण्यात येणार आहे. पहिल्या गटासाठी ‘बाबासाहेबांचे बालपण’, व ‘बाबासाहेब यांनी दिलेले सुविचार’ हे विषय असून स्पर्धकाने कोणत्याही एका विषयावर ३ ते ४ मिनिटे वक्तृत्व सादर करायचे आहे. मोठ्या गटासाठी ‘बाबासाहेबांचे शिक्षणासाठी संघर्षमय जीवन’, ‘आजच्या युवकांसाठी बाबासाहेबांचे विचार’, ‘सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते बाबासाहेब’ हे विषय ठेवण्यात आले असून वेळ ४ ते ६ मिनिटे आहे. स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांक व दोन उत्तेजनार्थ विजेत्याना रोख पारितोषिक देण्यात येईल. २९ एप्रिल पर्यंत विडिओ बनवून भावना बांदेकर (मो ९५४५१३७६०८) किंवा स्वप्नील बांदेकर (मो. ९०९६६०४३२७) यांच्याकडे पाठवावा.
मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम शनिवार दिनांक २ मे २०२६ रोजी रात्री ठीक ८.०० वाजता आंबेडकर नगर समाज मंदिर, बांदा येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बांदा येथे आंबेडकर जयंतीनिमित्त २ मे रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रम…
