⚡बांदा ता.२२-: निगुडे-पाटीलवाडी येथील पीटर फ्रान्सिस फर्नांडिस (वय 45) यांचा विहिरीत कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीटर फर्नांडिस यांना विहिरीच्या कठड्यावर बसून दारू पिण्याची सवय होती. नेहमीप्रमाणे ते तेथे गेले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी गुरे गोठ्यात असल्याने त्यांना पाहण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना विहिरीजवळ चप्पल तसेच दारूची रिकामी बाटली आढळून आली. यानंतर शोध घेतला असता ते विहिरीत पडल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. बांदा पोलिसांना याबाबत कळविण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या प्रकरणी बांदा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
निगुडे पाटीलवाडीत विहिरीत पडून इसमाचा मृत्यू…
